बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील दनियावा येथे शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण या ऑटोने गंगा स्नान करण्यासाठी नालंदा येथून फतुहा येथे जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. रास्त्यात एक भरधाव ट्रक त्यांच्या ऑटोला धडकला. हा अपघात एकवढा भीषण होता की ऑटोचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.
ट्रक चालक वाहनासह फरार -अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला आहे. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले असता, त्यांची गंभीर स्थिती पाहून त्यांना पाटण्याला रेफर करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक नालंदा जिल्ह्यातील हिलसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेरी मलमा गावातील रहिवासी होते. ते आज (शनिवारी) सकाळच्या सुमारस फतुहा येथे गंगा स्नानासाठी जात होते. मात्र, त्यांच्या ऑटोला येथील अल्ट्राटेक फॅक्ट्रीजवळ एक ट्रक धडकला. या अपघातात सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पटण्यात जखमींवर उपचार - मृतांमध्ये सात महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. तर जखमी सहा जणांवर पाटणा येथे उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटवली जात आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून फरार ट्रक चालकाचाही शोध सुरू करण्यात आला आहे.