झारखंडच्या देवघर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कावडियांना घेऊन जाणारी बस भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात १९ कावडियांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. गोड्डा-देवघर मार्गावर मोहनपूर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला आहे. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. यानंतर मदतकार्य सुरु झाले.
गॅस सिलिंडर नेत असलेल्या ट्रकवर ही बस आदळली आहे. जंगल भागात हा अपघात झाल्याने मदतकार्यातही अडथळे येत होते. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो कारण अपघातातील अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने जवळच्या सरकार आणि रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
झारखंडमधील प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ मंदिरात श्रावणी मेळ्यामुळे आजकाल भाविकांची मोठी गर्दी असते. झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.