सशस्त्र दलाच्या 700 हून अधिक जवानांनी केल्या आत्महत्या, गृहराज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:08 IST2024-12-05T18:07:13+5:302024-12-05T18:08:07+5:30
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नांच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सशस्त्र दलाच्या 700 हून अधिक जवानांनी केल्या आत्महत्या, गृहराज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) 700 हून अधिक जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच, या कालावधीत 55,555 जणांनी राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दरम्यान, विभाग किंवा यंत्रणेकडून त्रास होत असल्याने आत्महत्या केल्याचे असे एकही प्रकरण समोर आलेले नाही. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नांच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
नित्यानंद राय म्हणाले की, 2020 मध्ये सीएपीएफमध्ये 144 आत्महत्या झाल्या होत्या, तर 2021 मध्ये 157 प्रकरणे समोर आली. तसेच, 2022 मध्ये 138, 2023 मध्ये 157 आणि 2024 मध्ये 134 आत्महत्या झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली होती. सीएपीएफमध्ये पाच वर्षात एकूण 730 आत्महत्या झाल्या. तसेच, गेल्या पाच वर्षांत 47,891 सीएपीएफ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि 7,664 जणांनी राजीनामा दिला आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये (CAPF) साधारणपणे आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम केले जाते, असे नित्यानंद राय यांनी सांगितले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गत मध्ये आसाम रायफल्स (AR), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांचा समावेश असून हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
1 लाखाहून अधिक पदं रिक्त
सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 1 लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत सांगण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती. रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे,असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले.