Noida Crime : सोशल मीडियावर नोएडामधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये काळ्या रंगाची Thar अतिशय वेगाने आणि बेजबाबदारपणे अनेक वाहनांना उडवताना दिसतेय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी थार चालकाला दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थारवर स्टिकर लावण्यावरून थार चालक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. थार चालकाने शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोपही कर्मचाऱ्याने केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, नोएडाच्या सेक्टर-16 मध्ये कार मार्केट आहे. आरोपी थार चालक या मार्केटमधील एका दुकानात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लोहिया असे थार चालकाचे नाव असून, तो दिल्लीतील आया नगरचा रहिवासी आहे. 10 मार्च रोजी तो कार मार्केटमध्ये त्याच्या थारवर स्टिकर लावण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी काही कारणावरून वाद झाला.
घटना सीसीटीव्हीत कैदकाही वेळातच कर्मचारी आणि सचिन लोहिया यांच्यात शिवीगाळ आणि मारामारी झाली. दुकानात काम करणाऱ्या फिरोजने सांगितले की, थारचा मालक सचिन लोहिया शिवीगाळ करत होता. त्याने शिवीगाळ करण्यास मनाई केल्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली आहे.
दिल्लीतून आरोपीला अटकपीडित फिरोजच्या तक्रारीवरून नोएडा पोलिसांनी फेज-वन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. नोएडाचे डीसीपी राम बदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून आणि पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने बुधवारी दिल्लीतून आरोपीला अटक केली.