बिहारमध्ये झाले ऐतिहासिक ६४.६६ टक्के मतदान; किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:08 IST2025-11-07T13:08:18+5:302025-11-07T13:08:44+5:30
पहिल्या टप्प्यातील १२१ जागांवरील १३१४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

बिहारमध्ये झाले ऐतिहासिक ६४.६६ टक्के मतदान; किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी १२१ जागांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३.७५ कोटी मतदारांपैकी ६४.६६ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. हे त्या राज्यातील आजवर झालेले सर्वाधिक मतदान आहे. राज्यात मतदान सुरू असताना काही ठिकाणी हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्या. उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी आपल्या ताफ्यावर राजदच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा केला. बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६७.३२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ समस्तीपूर (६६.६५ टक्के) आणि मधेपुरा (६५.७४ टक्के) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. पहिल्या टप्प्यात राजदचे तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा तसेच अनेक मंत्री अशा महत्त्वाच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा कारभार तसेच १२५ युनिट मोफत वीज, एक कोटीहून अधिक महिलांना १० हजार रुपयांची रोख मदत, सामाजिक सुरक्षा पेन्शनमध्ये वाढ अशा निर्णयांमुळे मतदार एनडीएलाच मतदान करेल अशी त्या आघाडीला आशा आहे. मात्र, बिहारमध्ये आता सत्तापालटासाठी मतदान करा, असे आवाहन इंडिया आघाडीकडून जनतेला करण्यात आले.
मतदान वाढल्याने काय घडले?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे ६४.६६ टक्के मतदान नोंदवले गेले. एकूण १८ जिल्ह्यांतील सर्व ४५,३४१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. यापूर्वी बिहारमध्ये २००० साली सर्वाधिक ६२.५७ टक्के मतदान झाले होते. यावेळी नितीशकुमार यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, तेवढे संख्याबळ नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी सरकार स्थापन केले.
शहरी मतदारसंघांमध्ये कमी मतदान
बिहारमध्ये गुरुवारी १८ जिल्ह्यांत मतदान झाले. मुजफ्फरपूर आणि गोपालगंज येथे दुपारी ३ वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर पाटणा जिल्ह्यात मतदानाचा टक्का केवळ ४८.६९ एवढाच होता. बंकीपूर येथे ३४.८० टक्के, दिघा येथे ३१.८९ टक्के आणि कुम्हरार येथे ३७.७३ टक्के या शहरी मतदारसंघांत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही.
‘मतदान आपली जबाबदारी’
मतदान हा अधिकार नाही, तर ती महत्त्वाची जबाबदारीही आहे, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले. बख्तियारपूर या मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी याबाबत पोस्ट केली.
‘राजद समर्थकांचा हल्ला’
मतदानादिवशी राजदच्या समर्थकांनी आपल्या ताफ्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी केला. हे लोक मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न करीत होते, असे त्यांनी नमूद केले.
‘निवडणूक चोरी’ची तयारी : प्रियांका
हरयाणाप्रमाणेच बिहारमध्येही एनडीए ‘निवडणूक चोरी’च्या तयारीत असल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. विविध जाहीर सभांत त्यांनी निवडणूक आयोगही देशाची घटना तसेच लोकशाही कमकुवत करण्यासाठी सरकारशी हातमिळवणी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.