पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचेपाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित अली हसनसोबतचं आणखी एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. यामध्ये ज्योती पाकिस्तानमध्ये लग्न करण्याबद्दल बोलत आहे. ज्योती मल्होत्राने स्वतः व्हॉट्सअॅप चॅटवर अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही, परंतु ज्योतीने सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची अशी इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. जर पाकिस्तानी युट्यूबर किंवा कोणत्याही लोकप्रिय व्यक्तीशी लग्न केलं तर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढतील. यामुळे तिच्या पोस्टला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळतील असं तिला वाटत होतं.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिशप्रमाणेच हसन अली हा देखील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आहे. दानिशच्या माध्यमातून ज्योती हसन अलीच्या संपर्कात आली. तिच्या पाकिस्तान भेटीदरम्यान, हसन अलीनेच तिच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते प्रवासापर्यंत व्हीआयपी सुविधांची व्यवस्था केली होती. पाकिस्तानहून परतल्यानंतरही ज्योती मल्होत्रा हसन अलीच्या सतत संपर्कात होती. पाकिस्तानमधील वास्तव्यादरम्यान हसन अलीने तिची ओळख शाकीर आणि राणा शाहबाजशी करून दिली होती.
हसन अलीने व्हॉट्सएपवर लिहिलं की, "तू नेहमी आनंदी राहा अशी मी प्रार्थना करतो. तू नेहमी अशीच हसत-खेळत राहा, तुझ्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये." याला उत्तर म्हणून, ज्योती मल्होत्राने हसणारा इमोजी पाठवला. यानंतर तिने लिहिलं की, "तर मग माझं लग्न पाकिस्तानात करा." हे चॅट जरी विनोदी वाटत असलं तरी पोलीस त्यातून अनेक अर्थ काढत आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, ज्योती पाकिस्तानमध्ये स्वतःसाठी मुलगा शोधत होती.
ज्योती पाकिस्तानमधील अनेक लोकांशी सोशल मीडियावर चॅट करत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्योतीने स्वतः कबूल केलं आहे की ती पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांशी व्हॉट्सअॅप, स्नॅप चॅट आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर चॅट करायची. या काळात तिने अनेक संवेदनशील माहितीची देवाणघेवाणही केली. तिने सांगितलं की, ती दानिशला भेटायलाही अनेक वेळा गेली होती. ज्योतीचे चॅट आणि कबुलीजबाबावरून हे स्पष्ट होते की तिचे पाकिस्तानशी संबंध होते.