‘हेरगिरी’ने संसद दणाणली
By Admin | Updated: March 17, 2015 01:00 IST2015-03-17T01:00:57+5:302015-03-17T01:00:57+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ‘राजकीय हेरगिरी’ केली जात असल्याच्या मुद्यावरून सोमवारी विरोधकांनी संसदेची दोन्ही सभागृहे दणाणून सोडली.

‘हेरगिरी’ने संसद दणाणली
राहुल गांधींसाठी विरोधक आक्रमक : सरकार म्हणते, सुरक्षा व्यवस्थेचा भाग
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ‘राजकीय हेरगिरी’ केली जात असल्याच्या मुद्यावरून सोमवारी विरोधकांनी संसदेची दोन्ही सभागृहे दणाणून सोडली. पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि प्रमुख राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेबाबत प्रोफाईल तयार करणे हा सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहे. १९५७ पासून संपुआ सरकारच्या काळातही ही परंपरा चालत आली आहे, असे स्पष्ट करीत सरकारने आरोप फेटाळून लावले. राज्यसभेत काँग्रेसने सभात्याग करीत सरकारचा निषेध केला.
अलीकडेच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारून चौकशी केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हेरगिरीचा आरोप करीत सरकारला धारेवर धरले. पारदर्शक सुरक्षा प्रोफायलिंगचा भाग म्हणून ५२६ व्हीआयपींच्या प्रोफाईल तयार करण्यात आल्या असून संपुआ सरकारच्या काळापासून ही परंपरा चालत आली आहे. माजी पंतप्रधानांसह काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रोफाईल तयार करण्याचे काळ संपुआ सरकारच्या काळातही होत होते, असा खुलासा अरुण जेटली यांनी दोन्ही सभागृहात केला. लोकसभेत शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना काँंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांची राजकीय हेरगिरी केली जात असून ही बाब गंभीर आहे. सुरक्षेसंबंधी प्रोफाईल तयार करायचे असेल तर राहुल गांधींच्या जोड्याचा क्रमांक काय आहे. त्यांची जन्मापासूनची खूण काय आहे? असे प्रश्न का विचारले जात आहेत. मोदी सरकारने राजकीय नेत्यांवर पाळत ठेवून ‘गुजरात मॉडेल’ आणले आहे. लोकशाहीत असे कधीही घडले
नव्हते. त्यांनी दिलेली स्थगन प्रस्तावाची सूचना लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तीव्र निषेध; गदारोळ
प्रमुख राजकारण्यांच्या सुरक्षेचे प्रोफाईल तयार करणे ही पारदर्शक प्रक्रिया असून माजी पंतप्रधानांसह राजकीय नेत्यांच्या प्रमुखांबाबत अशाप्रकारे माहिती गोळा केली जाते, असे राज्यसभेत सरकारने नमूद केले. उपसभापती पी.जे. कुरियन यांनी नियम २६७ अंतर्गत स्थगन प्रस्ताव नाकारल्याने काँग्रेसने सभात्याग केला. विरोधकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कुरियन यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना फेटाळली. जेटली यांनी दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त करीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसच्या सदस्य सभागृहाबाहेर पडले.
दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना केले पाचारण
राहुल गांधी यांच्या हेरगिरीचा वाद उफाळून आला असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांना पाचारण करीत माहिती मागवून घेतली असून संसदेत त्यांच्याकडून निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे.
सुरक्षेचे राजकारण नको
उत्तरात अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बुटावरूनच त्याचे शव ओळखण्यात आले होते. सुरक्षेच्या मुद्याचे राजकारण केले जाऊ नये. १९५७ पासून देशाच्या व्यक्तींची सुरक्षा प्रोफायलिंग केले जात आहे.
परंपरेकडे लक्ष वेधले
प्रोफाईल अर्जात १९९९ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलही अर्ज भरून घेण्यात आले होते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी आॅक्टोबर २००४, २००९, २०१०, २०११ आणि २०१२ मध्ये ही प्रक्रिया अवलंबण्यात आली होती. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, माकपचे नेते सीताराम येचुरी, जेडीयूचे शरद यादव यांच्यासह राष्ट्रपती बनण्यापूर्वी प्रणव मुखर्जी यांच्यासाठीही याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला होता, अशी माहिती जेटली यांनी दिली.