अखंड हिंदुस्थानचा पहिला नारा मराठ्यांचा - डॉ. सदानंद मोरे

By Admin | Updated: April 3, 2015 18:26 IST2015-04-03T17:16:36+5:302015-04-03T18:26:45+5:30

अहमदशाह अब्दालीचा तहाचा प्रस्ताव धुडकावत शीखांच्या सहकार्याने उत्तर भारतात युद्धाला उभे ठाकलेले मराठे हे अखंड हिंदुस्थानचे पहिले पुरस्कर्ते होते

Hindustan's first slogan of Marathas - Dr. Sadanand More | अखंड हिंदुस्थानचा पहिला नारा मराठ्यांचा - डॉ. सदानंद मोरे

अखंड हिंदुस्थानचा पहिला नारा मराठ्यांचा - डॉ. सदानंद मोरे

>ऑनलाइन लोकमत 
घुमान (पंजाब ), दि. ३ - अहमदशाह अब्दालीचा तहाचा प्रस्ताव धुडकावत शीखांच्या सहकार्याने उत्तर भारतात युद्धाला उभे ठाकलेले मराठे हे अखंड हिंदुस्थानचे पहिले पुरस्कर्ते होते असे ठामपणे घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यश्र सदानंद मोरे यांनी सांगितले. पंजाबपर्यंतच्या प्रांतावर अब्दालीचे राज्य राहील आणि त्या पलीकडच्या भागावर मराठ्यांनी राज्य करावे असा प्रस्ताव अब्दालीने मराठ्यांना दिला होता. परंतु हिंदुस्थानची सीमा कंदाहार - काबूलपर्यंत असल्याचे सांगत मराठ्यांनी तह केला नाही आणि भारतातल्या सगळ्या जाती - धर्माच्या राज्यांना घेत अब्दालीचा मुकाबला करण्याची तयारी केल्याचे मोरे म्हणाले. या युद्धामध्ये शीखांनी मराठ्य़ांना साथ दिल्याचे सांगताना मोरे यांनी शीख धर्म स्थापन होण्यापूर्वीपासून नामदेवांच्या माध्यमातून पंजाब व महाराष्ट्र यांच्या सहकार्याला सुरूवात झाली होती असे प्रतिपादन मोरे यांनी केले. नामदेवांचे अभंग गुरू ग्रंथसाहिबमध्ये येतात कारण त्याआधी शेकडो वर्षे नामदेवांनी पंजाबचं व महाराष्ट्राचं नातं जोडलेलं असतं असं मोरे सांगतात.
त्यामुळे देश स्वतंत्र होण्याअगोदरपासून महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये जिव्हाळयाचे संबंध होते आणि महाराष्ट्र पंजाबचे तर पंजाब महाराष्ट्राचे रक्षण करताना अनेकांनी पाहिले आहे, असे ते म्हणाले. अनेक दाखले देत मराठे - शीख यांच्या मैत्रीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे आजपासून ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठया थाटात प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सदानंद मोरे बोलत होते.  संमेलनाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमधील अनेक बाबतीत साम्य असून या दोन राज्यांमध्ये शेकडो वर्षापासून मैत्री चालत आलेली आहे. ज्यावेळी साहित्य संमेलन घुमानला घ्यायचं ठरलं त्यावेळी अनेकांनी प्रश्न विचारला की, महाराष्ट्र सोडून तुम्ही घुमानला संमेलन का घेतायत? त्यावर मी अनेकांना विचारले की, घुमानला साहित्य संमेलन घ्यायचं नाही तर कुठं घ्यायचं? असं विचारल्यावर विचारणा-याकडे याचे उत्तर नाही मिळाले. संमेलनांच्या ठिकाणावरुन जी चर्चा झाली ती अनाठायी आहे असे सांगून डॉ. मोरे म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनांसाठी देशात घुमान सारखे ठिकाण अन्य कुठेही नाही. नामदेवाची प्रेरणा ही प्रांत व धर्माच्या पलिकडची आहे. पंजाब-महाराष्ट्राचे नाते हे ऐतिहासिक व प्रेरणादायक असल्याचे मोरे यावेळी म्हणाले.
संमेलानाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या शरद पवार यांनी घुमानला साहित्य संमेलन ठेवले ते योग्यच असून संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली ती यथोचित असल्याचे म्हटले. मुंबई, पुणे, नागपूरला मराठी टक्का घसरतोय अशी आठवण करुन देतानाच मराठी भाषेला आभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा अशी मागणी केली. तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घुमानला साहित्य संमेलन भरवल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे आभार मानले. घुमानसाठी चौपदरी रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल अशी घोषणाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी केली. 

Web Title: Hindustan's first slogan of Marathas - Dr. Sadanand More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.