नवी दिल्ली : ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेत हिंदूंवर हल्ले आणि मंदिरांची तोडफोड झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे, अशी माहिती सरकारने शुक्रवारी संसदेत दिली.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपासून अमेरिकेत हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याच्या पाच आणि कॅनडामध्ये चार घटना घडल्या आहेत.
उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी परराष्ट्र मंत्रालयाला विचारले की, काही देशांमध्ये हिंदूंवर हल्ले, त्यांच्या मंदिरांची तोडफोड झाल्याच्या घटना सरकारच्या निदर्शनास आल्या आहेत का आणि त्याची दखल घेतली का?
सिंह म्हणाले की, ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेत हिंदूंवर हल्ले आणि हिंदू मंदिरांची तोडफोड झाल्याचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र, स्कॉटलंड (ब्रिटन) मध्ये असा प्रकार घडला नाही.सरकार काय करते?
जेव्हा जेव्हा अशी प्रकरणे आमच्या निदर्शनास येतात तेव्हा संबंधित संघटना आणि व्यक्तीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातात, असे सरकारने म्हटले.