हिंदीने २५ भाषा संपविल्या, आम्ही ‘तमिळ’चे रक्षण करू; मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:40 IST2025-02-28T04:39:49+5:302025-02-28T04:40:07+5:30
हिंदी भाषेच्या विरोधात ‘द्रमुक’ने १९६५ साली आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आम्ही आता दुसऱ्यांदा उभारू, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे.

हिंदीने २५ भाषा संपविल्या, आम्ही ‘तमिळ’चे रक्षण करू; मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कडाडले
चेन्नई : तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांचा आम्ही प्राणपणाने विरोध करू. हिंदी भाषा हा मुखवटा व त्याच्या आड दडलेली संस्कृत भाषा हा खरा चेहरा आहे. तमिळ भाषा व संस्कृतीचे रक्षण करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी सांगितले.
ते म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे हिंदी भाषा लादण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा स्टॅलिन यांचा आरोप केंद्र सरकारने याआधीच फेटाळून लावला आहे. हिंदी भाषेच्या विरोधात ‘द्रमुक’ने १९६५ साली आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आम्ही आता दुसऱ्यांदा उभारू, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे.
ते म्हणाले की, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील मैथिली, ब्रजभाषा, बुंदेलखंडी, अवधी या भाषा हिंदीच्या प्रभावामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उत्तर भारतातील २५ हून अधिक भाषांचा हिंदी-संस्कृतच्या वर्चस्वामुळे ऱ्हास होत आहे. मात्र, किमान शतकभर चाललेल्या द्राविडी चळवळीमुळे तमिळ भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्यात यश आले आहे. त्रिभाषा सूत्रानुसार तिसऱ्या क्रमांकावर एखादी विदेशी भाषा असू शकते, असे सांगितले जाते; पण भाजप अनेक राज्यांमध्ये तिसरी भाषा म्हणून संस्कृतचा आग्रह धरत आहे,
असा आरोपही एम. के. स्टॅलिन यांनी केला. (वृत्तसंस्था)
‘तमिळ भाषेची उपेक्षा होण्याची भीती’
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, भाजपशासित राज्यात उर्दू शिक्षकांच्या ऐवजी आता संस्कृती शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. तामिळनाडूने राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्र स्वीकारले तर तमिळ या मातृभाषेची उपेक्षा होईल व भविष्यात संस्कृतचा वरचष्मा वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.