हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:35 IST2025-09-24T17:34:16+5:302025-09-24T17:35:23+5:30
डॉक्टरांनी एका गरीब महिलेच्या चुकीच्या पायावर सर्जरी केली.

हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
कर्नाटकातील हसन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (HIMS) या सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळाला आहे. डॉक्टरांनी एका गरीब महिलेच्या चुकीच्या पायावर सर्जरी केली. ही महिला तिच्या डाव्या पायातून रॉड काढण्यासाठी गेली होती. परंतु डॉक्टरांच्या चुकीमुळे भलत्याच पायावर सर्जरी करण्यात आली, ज्यामुळे तिला असह्य वेदना झाल्या. चिक्कमंगळुरु जिल्ह्यातील बुचनहल्ली कोप्पलू गावातील रहिवासी ज्योती ही मजुरी करते.
ज्योतीचा डावा पाय दोन वर्षांपूर्वी फ्रॅक्चर झाला होता, त्यानंतर तिच्या पायात रॉड बसवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी ज्योतीला रॉड काढण्यासाठी हसन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी चुकून तिच्या उजव्या पायावर सर्जरी केली. ही चूक ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. संतोष यांनी केली होती, ज्यांनी कोणतीही तपासणी न करता सर्जरी सुरू केली.
सर्जरी दरम्यान ज्योतीला असह्य वेदना होत असताना, तिने तिचा ऑक्सिजन मास्क काढला आणि वैद्यकीय पथकाला सांगितलं की रॉड तिच्या उजव्या पायात नाही तर डाव्या पायात आहे. डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आली. कुटुंबातील सदस्यांनीही या निष्काळजीपणाबद्दल रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांना ही चूक कोणालाही सांगू नये असं आवाहन केलं.
या घटनेची माहिती रुग्णालयात वेगाने पसरली, ज्यामुळे इतर रुग्णांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये संताप निर्माण झाला. HIMS चे संचालक डॉ. राजन्ना म्हणाले की, याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा घटनांमुळे रुग्णांना केवळ शारीरिक त्रास होत नाही तर रुग्णालय आणि डॉक्टरांवरील जनतेचा विश्वासही कमी होतो.