हाय हील्समुळे मोडलं मुलीचं लग्न
By Admin | Updated: May 5, 2017 22:16 IST2017-05-05T22:15:49+5:302017-05-05T22:16:32+5:30
कर्नाटकातील एका वधूलादेखील उंच टाचांची चप्पल वापरणं खूपच महाग पडले आहे. इतकं महाग की तिचे उंच टाच असलेल्या चप्पलेच्या नादापायी तिचं लग्नच मोडले.

हाय हील्समुळे मोडलं मुलीचं लग्न
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 - उंच व स्मार्ट दिसावं, यासाठी महिला वर्गातील अनेक जणी उंच टांचाच्या (हाय हील्स) चपला वापरणं पसंत करतात. पण अनेकदा या उंचच्या टाचांच्या या चपला त्रासदायक ठरतात. कर्नाटकातील एका वधूलादेखील उंच टाचांची चप्पल वापरणं खूपच महाग पडले आहे. इतकं महाग की तिचे उंच टाच असलेल्या चप्पलेच्या नादापायी तिचं लग्नच मोडले.
त्याचं झालं असं की, लग्नाच्या एक दिवस आधी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान उंच टाचांच्या चप्पला वापरुन मिरवल्यामुळे नववधू बरीच थकली आणि थलक्यामुळे तिची शुद्धच हरपली.
यावेळी नव-या मुलाने हा प्रकार पाहून तिला आकडी येण्याचा आजार असल्याचा आरोप केला. यामुळे नाराज होऊन मुलीकडील मंडळींनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.नवरी मुलगी पहिल्यांदाच उंच टाचांची चप्पल वापरत होती. नव-या मुलाच्या उंचीला पोहोचण्यासाठी तिने उंच टाचांची चप्पल घेतली होती. मात्र सवय नसल्याने उंच टाचांची चप्पल जवळपास 4 तास पायांत राहिल्याने तिला त्रास होऊ लागला. अखेर ती बेशुद्ध होऊन कोसळली. यावर नव-या मुलाकडील मंडळींनी मुलीला आजार असल्याचा आरोप केला. यावर मुलीकडच्यांनी आजारपणाचा आरोप फेटाळत थेट लग्नच मोडण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.
लग्न मोडल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नसोहळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा रक्कम देण्याची मागणी केली. ज्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांसमोर मुलाकडील मंडळींनी मुलीच्या कुटुंबीयांना रोख 1 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांचा चेक सोपवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दोघांनी परस्पर समजुतीने प्रकरण मिटवले आहे. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांतील एका सदस्याने असा दावा केला आहे की मुलाकडच्यांनी आता आमच्या घरातील छोट्या मुलीसोबत त्यांच्या मुलाचे लग्न लावून देण्याची इच्छा व्यक्त आहे. यासाठी त्यांनी 10 लाख रुपयांचा हुंडादेखील मागितला आहे. मात्र त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.