इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:36 IST2025-11-06T15:35:33+5:302025-11-06T15:36:37+5:30
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे.

इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना, भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाचा फोन आला आहे. त्यांना भारताच्या पारदर्शक निवडणूक प्रणालीचा अभ्यास करायचा आहे, यासाठी ते आपले खासदार पाठविणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मोसोथो मोएपिया यांनी कुमार यांना फोन करून बिहार निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे खासदार जगातील सर्वात पारदर्शक आणि प्रभावी मानल्या जाणाऱ्या निवडणूक प्रणालीची जवळून माहिती घेण्यासाठी लवकरच भारताला भेट देण्याचा विचार करत असल्याचे मोएपिया यांनी सांगितले.
निवडणूक आयोग सध्या वादात...
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा निवडणूक आयोग सध्या वादात सापडलेला आहे. राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच विरोधक मतदार यादी स्वच्छ करण्यास सांगत आहेत. एकाच मतदाराची अनेकदा नावे, एकाच घरात हजारावार मतदार नोंदणी, एकाच फोटोचे अनेक मतदार असे अनेक घोटाळे समोर आणत आहेत. खोट्या पत्त्यांनी, फोटोंद्वारे अनेक मतदार नोंदविले जात आहेत. या सर्वांची नावे वगळून दोषमुक्त मतदार यादी तयार करावी अशी मागणी करत आहेत. अशातच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे.