बिहारची राजधानी पटनामधील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी गुपचूप लग्न उरकले आहे. पाकिस्तानसोबत हवाई युद्ध सुरु असताना खान सर यांनी हे लग्न केले आहे. सोमवारी त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच याची घोषणा केली. तसेच येत्या २ जूनला रिसेप्शन ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले.
खान सर यांच्या लग्नाची माहिती त्यांच्या मित्रपरिवाराला तसेच कुटुंबीयांनाच होती. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला ही माहिती देण्यात आली नव्हती. युट्यूबवर विद्यार्थांच्यासाठीच्या अपलोड केलेल्या व्हिडीओत त्यांनी ही माहिती दिली आहे. ए एस खान नावाच्या तरुणीसोबत त्यांनी लग्न केले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
खान सर तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. खान सर त्यांच्या अनोख्या शिकवण्याच्या शैलीसाठी आणि सामाजिक विषयांवर स्पष्टपणे बोलण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहेत.२ जूनला पटनामध्ये रिसेप्शन पार्टी ठेवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आता हे रिसेप्शन देखील सर्वांना खुले असेल की काही मोजक्याच लोकांना ते त्यांनी सांगितलेले नाही. ७ मे रोजी त्यांनी हे लग्न केल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
खान सर यांचे खरे नाव फैजल खान असे आहे. ते एक शिक्षक आणि YouTube कंटेंट क्रिएटर आहेत. यूट्यूबवरील 'खान जीएस रिसर्च सेंटर' या शैक्षणिक चॅनेलचे सुमारे २.४ कोटी सबस्क्राइबर आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी परवडणाऱ्या कोचिंगच्या शोधात असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पाटणा येथे 'चॅम्पियन्स ऑफ चेंज बिहार पुरस्कार सोहळ्यात' खान सरांना सन्मानित केले आहे.