तिरुवनंतपुरम - केरळमधील गोकुल श्रीधर नामक तरुणाने आपल्या आईसाठी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गोकुळने आपल्या आईच्या दुसऱ्या विवाहानिमित्त तिला शुभेच्छा देताना ही भावूक पोस्ट लिहिली आहे. माझ्या आईने तिच्या पहिल्या विवाहामध्ये अनेक हालअपेष्टा भोगल्या. तिला शारीरिक हिंसेचा सामना करावा लागला. मात्र माझ्या पालनपोषणासाठी तिने हे सर्व काही सहन केले. आता तिचा दुसरा विवाह होऊन नव्याने संसार सुरू होत आहे, याचा मला आनंदच आहे, असे या तरुणाने मल्याळम भाषेतून लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गोकुल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ''एक अशी स्री जिने आपले संपूर्ण जीवन माझ्यासाठी कुर्बान केले. एका वाईट संसारामध्ये खूप काही सहन केले. अनेकवेळा मी तिला शारीरिक हिंसाचाराची शिकार होताना पाहिले. तिच्या डोक्यावरून रक्ताचे ओघळ येताना पाहिलेत. हे सर्व का सहन करतेस? असं मी तिला अनेकवेळा विचारले. पण मी तुझ्यासाठी सारे काही सहन करू शकते, असे तिचे उत्तर असायचे. तिने आपले संपूर्ण तारुण्य माझ्यावर ओवाळून टाकले. आता तिची स्वत:साठीची खूप काही स्वप्न आहेत. मला वाटते हे असे काही आहे जे मला कुणापासून लपवण्याची गरज नाही. आई, तुझे नवे वैवाहिक जीवन आनंदी राहो.''
आईच्या दुसऱ्या विवाहाप्रसंगी मुलाने लिहिले भावूक पत्र, सोशल मीडियावर झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 17:54 IST