मुंबई - राज्यात आता नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली होती. त्यानंतर, ही तुलना चुकीची असल्याचा सूर निघाला. आता, याबाबत स्वत: हेमा मालिनी यांनी मिश्कीलपणे उत्तर दिलंय.
गुलाबराव पाटलांच्या रस्त्यासंदर्भातील विधानानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. हेमा मालिनी या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपा नेत्या व खासदारही आहेत. त्यामुळे, गुलाबराव पाटील यांच्या विधानावरुन भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र, हेमा मालिनी यांनी अतिशय मिश्कीलपणे यास उत्तर दिलं असून याने मला काहीही फरक पडत नसल्याचेही म्हटले आहे.
'मला माझे गाल प्रॉपरली आणि सेफली ठेवावे लागतील, असे म्हणत हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानावर मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली. लालू प्रसाद यादव यांनी काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड सुरू केला होता. त्यामुळे, त्यांना वाटलं असेल असं काही, पण महिलांबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे. मला या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनीही दिली प्रतिक्रिया
"अशाप्रकारची तुलना यापूर्वीही करण्यात आली होती. हा हेमा मालिनी यांच्याविषयी आदर आहे. याचा काही नकारात्मक अर्थ घेऊ नये. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनीदेखील अशाप्रकारचं वक्तव्य केलं होतं. आम्हाला हेमा मालिनी यांच्याविषयी आदर आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा
"गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखरच चुकीचं विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठिशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसांत विसंवाद सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपाला पसंती देईल", असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला होता.
काय म्हणाले होते पाटील?
"गेली ३० वर्ष ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्त करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत", असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानावर आता निषेध व्यक्त केला जात आहे.