बंदीस्त नाट्यगृह ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार खडसेंनी केली पाहणी: उद्घाटनास हेमा मालिनी येणार

बंदीस्त नाट्यगृह ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार खडसेंनी केली पाहणी: उद्घाटनास हेमा मालिनी येणार

जळगाव : नाशिक विभागात कोठेही नाही असे भव्य बंदीस्त नाट्यगृह शहरात आकार घेत असून ऑक्टोबरमध्ये त्याचे काम पूर्ण होईल व उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने खासदार हेमा मालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असल्याची माहिती या प्रकल्पास भेट दिल्यानंतर पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांना दिली.
महाबळ कॉलनी रोडवर वातानुकुलित नाट्यगृहाचे काम सुरू आहे. बांधकाम (सिव्हील वर्क) आता अंतिम टप्प्यात आहे. तर वरती शेड टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाला गती यावी म्हणून पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी नाट्यगृहस्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, जिल्हा बॅँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे उपस्थित होते.
कामाला गती द्यावी
नाट्यगृहाचे हे बांधकाम ३३ कोटींचे आहे. यातील वाढीव खर्चास अर्थमंत्र्यालयाने मंजुरी दिली असून त्यासाठी ५ कोटींचा निधीही मंजूर झाला असल्याचे खडसे यांनी सांगितले. कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना केल्या. पावसाळ्याच्या आत सिव्हील वर्क पूर्ण व्हावे व ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण व्हावे अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. नाशिक विभागातील पाच जिल्‘ात कोठेही नाही असे हे नाट्यगृह असेल असेही त्यांनी सांगितले.
असे असेल बंदीस्त नाट्यगृह
नाट्यगृहाचा तळमजला १७४२.२५ चौ.मी.असून पहिला मजला १७५९.८३ चौ.मी. व दुसरा मजला ७८५.८० चौ.मी. एवढे चटई क्षेत्र असलेली ही इमारत असेल. आर.सी.सी.पद्धतीचे हेे संपूर्ण बांधकाम आहे. नाट्यगृहाची आसनक्षमता १२०० एवढी आहे. नाट्यगृहामध्ये सेंट्रलाईज वातानुकुलित यंत्रणेची तरतूद केली जाणार आहे. इमारतीत लायब्ररी हॉल, दोन सराव कक्ष, कलावंतांसाठी दोन सूट, बाल्कनीसह बसण्याची सुविधा येथे असेल. कार्यक्रम सुरू असताना लहान मुले रडत असल्यास मागच्या बाजुने काचेने बंदीस्त केलेले क्राय रूम बांधण्यात येत आहे.
उद्घाटनास हेमा मालिनी येणार
नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान खासदार हेमा मालिनी यांच्या कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होईल. याबाबत त्यांची सहमतीही मिळाली आहे. तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम त्यावेळी होतील. हे नाट्यगृह जळगावकरांसाठी मोठी उपलब्धी ठरले असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hema Malini to be inaugurated, will be completed in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.