भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, मंगळवारी दुपारी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोचे विमान मुंबईला निघण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला. यानंतर, एअरलाइन व्यवस्थापनाने तातडीने विमानतळावरहाय अलर्ट जारी केला आणि कोलकाता-मुंबई इंडिगो फ्लाइट क्रमांक '६ई ५२२७' उड्डाण तत्काळ थांबवले.
या विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यानंतर विमान देखील विमानतळाच्या आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले, जिथे बॉम्ब निकामी पथकाने त्याची कसून तपासणी केली. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात विमानात बॉम्ब नसल्याचे पुष्टी झाली, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.
विमानातून सर्व सामानही उतरवले!
प्रवाशांनी चेक इन केल्यानंतर हा निनावी फोन आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विमान दुपारी १.३० वाजता उड्डाण करणार होते आणि ४.२० वाजता मुंबईत उतरणार होते. मात्र, हा अज्ञात फोन कॉल येताच आपत्कालीन नियमांनुसार सर्व १९५ प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले आणि विमानाला आयसोलेशन बेसमध्ये नेण्यात आले. विमानातून सर्व सामान उतरवण्यात आले. या घटनेनंतर विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानतळावर सुरक्षा कडक केली आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करत असून, तो फोन कुठून आला याचा शोध घेतला जात आहे.