हॅलो 3- कुंकळ्ळीला प्रदूषणाचे ग्रहण
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
आठ वर्षांपासून कचर्याचे ढिगारे; सरकारचे दुर्लक्ष
हॅलो 3- कुंकळ्ळीला प्रदूषणाचे ग्रहण
आठ वर्षांपासून कचर्याचे ढिगारे; सरकारचे दुर्लक्षकुंकळ्ळी : कुंकळ्ळीला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्ती केव्हा मिळणार, असा प्रश्न कुंकळ्ळीवासीय विचारत आहेत. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण कधी सुटणार, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहेत. मागील आठ वर्षांपासून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सुमारे पंचावीस हजार टन घातक रासायनिक कचरा साठलेला आहे. मात्र, कचर्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारला यश आलेले नाही. कुंकळ्ळीतील सनराईज झिंग नावाच्या कंपनीतर्फे टाकण्यात आलेला कचरा गेली आठ वर्षे उघड्यावर पडून आहे. या कचर्याबरोबरच कारखान्यांतील घातक रासायनिक कचर्याच्या ढिगार्यांमुळे दुर्गंधी पसरलेली आहे. शिवाय सभोवतालचा परिसर प्रदूषित झाला आहे. याप्रदूषणामुळे या भागातील जैविक संपत्ती व मानवीय जीवनाला धोका निर्माण झाला आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सुमारे चाळीस हजार टन घातक रासायनिक घनकचरा साठवून ठेवला असून या कचर्यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे लोक संतप्त झालेले आहेत. विधानसभेत या विषयावर चर्चाही झालेली होती. मात्र, सरकारच्या आश्वासनावर लोक समाधानी नसून आता पुन्हा एकदा कुंकळ्ळीत या घातक कचर्यावर नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. चौकट : घातक रासायनिक पदार्थांचा समावेश..निकेल, केडमियम, कोबाल्ट व इतर घातक रासायनिक पदार्थांमुळे या भागात रोगराईला निमंत्रण मिळत आहे. या भागातील सुमारे दोन किलोमीटर आवारातील नद्या, विहिरी प्रदूषित झालेल्या आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, नेरी, जपानमधील तज्ज्ञ कंपनी व इतर अनेक तज्ज्ञांनी या भागातील प्रदूषणाचा अभ्यास करून ही भूमी पूर्णपणे प्रदूषित झाल्याचा अहवाल दिलेला आहे. या भागातील प्रदूषणाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी या प्रदूषणामुळे मानवीय जीवनाला धोका असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. चौकट : माणसाच्या जनन प्रक्रि येवर विपरित परिणामया भागात तयार होणार्या घातक रसायनामुळे माणसामधील जनन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याचा धोका संभवत असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. सरकारने या घातक रासायनिक घनकचर्यावर तोडगा काढण्यासाठी जैविक पध्दतीचा वापर करण्याचे ठरविले असून यासाठी विश्व बँकेकडून मदत घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. चौकट :सोशल मीडियावरही चर्चा.कुंकळ्ळीतील प्रदूषणाला जबाबदार कोण? यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून काही राजकारणी या प्रदूषणाचे खापर एकमेकावर फोडत आहेत. सध्या कचर्यामुळे मोठे वादंग सुरू आहे. आता पालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घातक कचर्याचे राजकारण पुन्हा एकदा प्रकाशात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)चौकट : मासळी प्रकल्पांमुळे प्रदूषणकुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत पूर्वी काँग्रेस सरकारने घातक रासायनिक कचरा निर्माण करणारे कारखाने आणून प्रदूषण फैलावले. तर आता भाजप सरकारने औद्योगिक वसाहतीत मासळी प्रकल्पाला मान्यता देऊन राहिलेली कसर पूर्ण केली. औद्योगिक वसाहतीत चार मासळी प्रक्रिया प्रकल्प आहेत. या प्रकल्पांकडून प्रदूषण नियंत्रण ठेवण्यात येत नसल्याचे उघड झालेले आहे. या कारखान्यामुळे या भागात उग्र दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.