दिल्ली, राजस्थानमध्ये भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्यांना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भटक्या कुत्र्यांची ही समस्या दिल्लीतच नाही तर मुंबई, पुण्यासह संपूर्ण देशभरात आहे. भटक्याच नाही तर पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी देखील उपद्रव केल्याचे व्हिडीओ येत असतात. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
एका दोन वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे या मुलाला कुत्रा चावला देखील नव्हता. तर कुत्र्याच्या लाळेतून मुलाच्या शरीरात रेबीजचे विषाणू गेले होते. यामुळे मुलाच्या पालकांना समजले देखील नाही अन् ते मुलाला गमावून बसले आहेत. बदायूंमधील सहस्वान भागात अदनान नावाच्या २ वर्षांच्या मुलाचा रेबीजने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुत्र्याने या मुलाची जखम चाटली होती. त्यातून हे विषाणू मुलात पसरले होते.
कुत्र्याने १ महिन्यापूर्वी अदनानची जखम चाटली होती. काही दिवसांनी मुलाला पाण्याची भीती आणि पाणी पिण्यास नकार देण्यासारखी लक्षणे दिसू लागली होती. जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा त्याला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, दुसऱ्याच दिवशी या मुलाचा मृत्यू झाला होता.
रेबीज म्हणजे काय?
रेबीज हा मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार आहे. हा आजार रॅपोव्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो. हा आजार प्राण्यांच्या चाव्याव्दारे किंवा चाटण्याद्वारे मानवांमध्ये पसरतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो. संक्रमित प्राण्यांच्या चाव्याव्दारे किंवा ओरखड्यांद्वारे मानवांमध्ये पसरतो. असे झाल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन रेबीजची लस घेणे गरजेचे असते. संक्रमित प्राण्याची लाळ उघड्या जखमेतून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून शरीरात गेल्यास देखील विषाणू पसरू शकतो.