Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:00 IST2025-12-17T13:59:23+5:302025-12-17T14:00:45+5:30
आपल्या पतीची अवस्था पाहून पत्नीने रस्त्यावरून जाणाऱ्यांकडे हात जोडून मदत मागितली. पण कोणीही मदतीला धावून आलं नाही. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
बंगळुरूमध्ये घडलेल्या एका अत्यंत वेदनादायक घटनेने आपत्कालीन आरोग्य सेवांमधील त्रुटी आणि समाजाची उदासीनता समोर आली आहे. सोमवारी हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नीसोबत रुग्णालयात जाणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आपल्या पतीची अवस्था पाहून पत्नीने रस्त्यावरून जाणाऱ्यांकडे हात जोडून मदत मागितली. पण कोणीही मदतीला धावून आलं नाही. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्यंकटरमणन असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास व्यंकटरमणनच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याची प्रकृती वेगाने खालावली. तत्काळ रुग्णवाहिका किंवा इतर व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे त्याची पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन निघाली. सर्वात आधी ती जवळच्या एका खासगी रुग्णालयात पोहोचली, मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचं सांगून उपचार नाकारण्यात आले.
No Ambulance, No Help, No Humanity: A Death That Questions Bengaluru
— Karnataka Portfolio (@karnatakaportf) December 16, 2025
In a deeply disturbing incident, Bengaluru witnessed a tragic collapse of both emergency care and basic human compassion. Venkataramanan, a 34-year-old mechanic from South Bengaluru, suffered severe chest pain… pic.twitter.com/I7Eb0m65hn
त्यानंतर ती दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात गेली, जिथे ईसीजीमध्ये सौम्य झटका आल्याचं स्पष्ट झालं. असं असूनही रुग्णालयाने ना तातडीने उपचार सुरू केले, ना रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. व्यंकटरमणनला जयदेवा इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोवस्कुलर सायन्सेस येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णवाहिका न मिळाल्याने हे दाम्पत्य पुन्हा स्कुटीवरून जयदेवा रुग्णालयाकडे निघाले. याच दरम्यान रस्त्यातच स्कुटीचा अपघात झाला. अपघातानंतर व्यंकटरमणन रस्त्यावर वेदनेने तडफडत होता, तर त्याची पत्नी हात जोडून लोकांकडे मदत मागत होती. पण कोणीही मदतीसाठी थांबलं नाही.
अखेर एका कॅब चालकाने माणुसकी दाखवत मदत केली आणि व्यंकटरमणनला जवळच्या रुग्णालयात पोहोचवलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. व्यंकटरमणन हा व्यवसायाने गॅरेज मेकॅनिक होता. जानेवारी २०२० मध्ये त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.