"छत्तीसगडचे मुख्यमंत्री राक्षस आहेत आणि त्यांना भगव्यामध्ये दोष दिसतो", अनिल विज यांची भूपेश बघेल यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 18:37 IST2022-12-19T18:37:07+5:302022-12-19T18:37:46+5:30
Anil Vij : प्रत्येक युगात देवता आणि दानव असतात, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हे आजचे राक्षसी स्वभावाचे महान व्यक्तिमत्व आहे, असेही अनिल विज म्हणाले.

"छत्तीसगडचे मुख्यमंत्री राक्षस आहेत आणि त्यांना भगव्यामध्ये दोष दिसतो", अनिल विज यांची भूपेश बघेल यांच्यावर टीका
हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री राक्षस आहेत आणि त्यांना भगव्यामध्ये दोष दिसतो, असे विधान अनिल विज यांनी केले आहे. तसेच, भूपेश बघेल यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. प्रत्येक युगात देवता आणि दानव असतात, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हे आजचे राक्षसी स्वभावाचे महान व्यक्तिमत्व आहे, असेही अनिल विज म्हणाले.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भगव्यामध्ये खूप दोष दिसतो, पण जेव्हा दिवस उगवतो तेव्हा तो भगवाच असतो आणि जेव्हा रात्र होते तेव्हाही भगवाच असतो, असे म्हणत अनिल विज यांनी त्यांच्यावर टीका केला. ते म्हणाले, "तिरंग्याच्या शीर्षस्थानी भगवा ठेवण्यात आला आहे. त्यात त्यांना दोष दिसतो. ज्या पदासाठी तिरंग्यासमोर शपथ घेतली होती, त्या पदाचा तात्काळ राजीनामा त्यांनी दिला पाहिजे."
दरम्यान, हा सगळा गोंधळ शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटापासून सुरू झाला आहे. पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे, भूपेश बघेल यांनी हिंदू संघटनांवर ताशेरे ओढताना सांगितले की, ज्यांनी घर, कुटुंब आणि समाजाचा त्याग केला आहे, तेच भगवे परिधान करतात, परंतु भगव्या रंगाची वस्त्रे परिधान करून बाहेर पडलेल्या बजरंगी गुंडांनी काहीही त्याग केले नाही. उलट वसूली करण्यासाठी भगवा परिधान करत आहेत.
"...आम्ही सीमेच्या आतल्या शत्रूंचा सामना करू"
यापूर्वी अनिल विज यांनी तवांगमधील हिंसक चकमकीवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही टीकास्त्र सोडले होते. तेव्हा अनिल विज म्हणाले होत की, "या घटनेनंतर चीनकडून एकही वक्तव्य आलेले नाही, मात्र भारतात बसलेल्या चीनच्या प्रतिनिधींचीच विधाने येत आहेत. त्यामुळे मी लष्कराला सांगेन की, तुम्ही सीमेपार असलेल्या शत्रूंशी सामोरे जा आणि आम्ही सीमेच्या आतल्या शत्रूंचा सामना करू."