पदक विजेत्या बॉक्सर्सच्या घरी हरियाणा सरकार पाठवणार गाय, मंत्री महोदयांनी सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 12:11 PM2017-12-01T12:11:50+5:302017-12-01T12:19:40+5:30

रोहतकमधील एका कार्यक्रमादरम्यान, युवा महिला बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत पदक जिंकणा-या राज्यातील खेळाडूंना सन्मान करण्यात आला. यावेळी या खेळाडूंना बक्षिस म्हणून गाय भेट देण्यात आली.  

Haryana government to gift cow as prize to woman boxers | पदक विजेत्या बॉक्सर्सच्या घरी हरियाणा सरकार पाठवणार गाय, मंत्री महोदयांनी सांगितले फायदे

पदक विजेत्या बॉक्सर्सच्या घरी हरियाणा सरकार पाठवणार गाय, मंत्री महोदयांनी सांगितले फायदे

Next
ठळक मुद्देयुवा महिला बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत पदक जिंकणा-या खेळाडूंना बक्षिस म्हणून गाय भेट देण्यात आलीहरियाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनखड यांनी ही घोषणा केली

चंदिगड - उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंना सरकारी नोकरी, जमीन किंवा महागड्या गाड्या बक्षिस म्हणून दिलं जाताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण हरियाणा सरकारने खेळाडूंनी विचारही केला नसेल असं बक्षिस दिलं आहे. हरियाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनखड यांनी खेळाडूंना देण्यात येणा-या बक्षिसांच्या यादीत गाईचाही समावेश केला आहे. रोहतकमधील एका कार्यक्रमादरम्यान, युवा महिला बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत पदक जिंकणा-या राज्यातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी या खेळाडूंना बक्षिस म्हणून गाय भेट देण्यात आली.  

ओम प्रकाश धनखड हे बॉक्सिंग हरियाणा असोसिएशनचे प्रमुखदेखील आहेत. खेळाडूंना गाय भेट म्हणून देत असल्याच्या निर्णयाचं समर्थन करताना त्यांनी गाईच्या दुधाचे फायदे सांगायला सुरुवात केली. एकामागोमाग एक त्यांनी गाईच्या दुधाचे फायदे सांगितले. 'म्हशीच्या तुलनेत गाईच्या दुधात कमी चरबी असते, आणि हे बॉक्सर्सच्या फायद्याचं आहे. तसंच गाय ही जास्त अॅक्टिव्ह असते, तर म्हैस जास्त वेळ झोपून असते. हरियाणात म्हणतात की, ताकद हवी असेल तर म्हशीचं दूध आणि सौदर्य, बुद्धी हवी असेल तर गाईचं दूध प्यावं. या खेळाडूंनी देशाचं नाव मोठं केलं आहे. त्यांना अजून चांगलं खेळताना पाहण्याची आमची इच्छा आहे', असं ओम प्रकाश धनखड म्हटले आहेत. 

बक्षिस म्हणून देण्यात येणा-या गाई देशी असतील, ज्या दिवसाला 10 लीटरपेक्षा जास्त दूध देतील हे सांगायला ओम प्रकाश धनखड विसरले नाही. सर्वच्या सर्व सहा बॉक्सर्स नितू, ज्योती गुलिया, साक्षी, शशी चोपडा, अनुपमा आणि नेहा यादव यांचे पत्ते नोंद करण्यात आले आहेत. गाय त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. 

मंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेमुळे खेळाडूदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. 'मला आजपर्यंत अनेक बक्षिसं मिळाली. मुर्तीपासून ते पुस्तकांपर्यंत सर्व काही मिळालं. पण मला आजपर्यंत गाय कोणी भेट दिलेली नाही. मला हे प्रचंड आवडलं आहे. माझ्या कुटुंबासाठी हा खजिना आहे', असं नितूने सांगितलं आहे. राज्यातील सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गाय भेट देण्यात येणार का ? असं विचारलं असता धनखड यांनी खेळ प्रकारावर ते अवलंबून असल्याचं सांगितलं. मी तेच देऊ शकतो जे माझ्याकडे आहे असं त्यांनी सांगितलं. 
 

Web Title: Haryana government to gift cow as prize to woman boxers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.