Haryana Farmers Write Letter To The President And PM | सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र 
सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र 

जुलाना - शाहबाद ते जयपूर या शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात येत असून यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण केल्या जात आहेत. मात्र जमीन अधिग्रहण करताना योग्य भाव दिला जावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहून सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. सरकारकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रात केला आहे. 

शेतकऱ्यांनी पत्रात नमूद केलं आहे की, सरकारकडून जमीन अधिग्रहण करताना बाजारभावानुसार किंमतीची घोषणा केली नाही. शेतकरी सरकारकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहात आहेत. शेतकरी नेते रमेश दलाल यांनी सांगितले की, मागील 5 महिन्यांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय त्यामुळे आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. 

12 जून रोजी शेतकरी आणि सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वसमंतीने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. मात्र समितीकडून बाजारभावानुसार जमिनीचा मोबदला देण्याबद्दल काहीच घोषणा केली नाही. अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत. 

आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. कायदा आमच्या बाजूने असताना मागील 5 महिने रस्त्यावर उतरुन आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. आम्ही आमच्या मागण्या मागत असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमचे हक्क मिळावे त्याकरिता सरकारशी लढण्यासाठी आमच्याकडे उर्जा नाही. अधिकाऱ्यांच्या अहंकाराच्या समोर आमचा पराभव झाला आहे. हा फक्त आमचा नाही तर देशाच्या संविधानाचा पराभव आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागतो असं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पत्रात लिहिलं आहे. 


Web Title: Haryana Farmers Write Letter To The President And PM
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.