हरियाणात महिलांच्या डिजे डान्सवर बंदी
By Admin | Updated: June 30, 2014 12:43 IST2014-06-30T12:23:45+5:302014-06-30T12:43:44+5:30
हरियाणातील अग्रवाल समाजाने महिलांनी डिजेच्या तालावर नाचायचे नाही असा फतवा काढला आहे. समाजातील एखादी महिला डिजेच्या तालावर नाचताना आढळल्यास तिला दंड आकारण्याचा प्रस्तावही या समाजाने मंजूर केला आहे.

हरियाणात महिलांच्या डिजे डान्सवर बंदी
ऑनलाइन टीम
जिंद( हरियाणा), दि. ३० - महिलांविरोधात अजब फतवे काढण्याची हरियाणातील परंपरा सुरु असून आता हरियाणातील अग्रवाल समाजाने महिलांनी डिजेच्या तालावर नाचायचे नाही असा फतवा काढला आहे. समाजातील एखादी महिला डिजेच्या तालावर नाचताना आढळल्यास तिला दंड आकारण्याचा प्रस्तावही या समाजाने मंजूर केला आहे.
हरियाणातील जिंदमधील जाट धर्मशाळा येथे अखिल भारतीय अग्रवाल समाजाने एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाविषयी माहिती देताना समाजाचे प्रधान लक्ष्मी नारायण बंसल म्हणाले, समाजातील महिला डिजेवर सुरु असलेल्या अश्लील गाण्यांवर वरात किंवा अन्य कार्यक्रमात नाचत असतील तर त्याचा समाजावर वाईट परिणाम होतो. अग्रवाल समाज अशा प्रकारच्या अश्लील प्रदर्शनाविरोधात असल्याने महिलांच्या डिजे नृत्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर केला आहे.
अग्रवाल समाज अशा प्रकारच्या नाचगाण्यांवर नजर ठेवणार असून महिला डिजेवर नाचताना आढळल्यास त्यांना आधी समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही महिलांनी नृत्य सुरु ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाईल असेही बंसल यांनी सांगितले. मात्र या निर्णयाविरोधात महिला संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.