आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:11 IST2024-09-24T17:10:36+5:302024-09-24T17:11:12+5:30
Haryana Assembly Election 2024: दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हरियाणात रोड शो आणि प्रचारसभा घेत रानिया येथे पोहोचलेल्या केजरीवाल यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्यानंतर मोठा दावा केला आहे.

आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हरियाणात रोड शो आणि प्रचारसभा घेत रानिया येथे पोहोचलेल्या केजरीवाल यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्यानंतर मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय हरियाणामध्ये पुढचं सरकार सत्तेवर येणार नाही, असे भाकित त्यांनी केले आहे.
हरियाणामधील प्रचारसभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, माझ्याकडे कुणीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला नव्हता. मात्र मी सत्तेसाठी हापापलेली व्यक्ती नाही आहे. मी राजीनामा दिला आणि आता दिल्लीच्या मतदारांना सांगितलं की, तुम्ही मला सत्तेत परत आणाल तेव्हाच मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात परत येईन.
मुळचे हरियाणातील असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी यावेळी स्वत:चा उल्लेख हरियाणाचा पुत्र असा केला. ते म्हणाले की, तुमच्या मुलाने दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केलं आहे. आता रानिया मतदारसंघात आम्हाला विजयी करा, असं आवाहनही त्यांनी केलं. रानिया विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. येथे आपने हरपिंदर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर आयएनएलडीने अर्जुन चौटाला यांना उमेदवारी दिली आहे. रंजित चौटाला हे येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपाने शीशपाल कंबोज यांना उमेदवार बनवले आहे. तर काँग्रेसकडून सर्वमित्र कंबोज हे उमेदवार आहेत.