छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलात २१.५९ कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हर्षकुमार क्षीरसागर, त्याचे वडील अनिल व आई मनीषा अखेर दहाव्या दिवशी पोलिसांच्या हाती लागले. हर्षकुमारला दिल्लीतून तर आईवडिलांना मुर्डेश्वर येथून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तिघांनाही बुधवारी शहरात आणले. हर्षकुमारला ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
२१ डिसेंबर रोजी उघडकीस आलेल्या घोटाळ्याची देशभरात चर्चा झाली. कंत्राटी काम करणाऱ्या हर्षकुमारने संकुलासाठी मिळणारा कोट्यवधींचा निधी ११ महिन्यांमध्ये लंपास केला. त्यातून कोट्यवधींचे फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित दागिन्यांसह परदेशवारीवर पैसे खर्च केले. मुलासह फरार झालेल्या आई-वडिलांचा पोलिस शोध घेत होते.
हर्षकुमारला दुपारी ३:३० वाजता न्यायालयात हजर केले. हर्षकुमारतर्फे ॲड. रामेश्वर तोतला यांनी हर्षकुमारने पोलिस आयुक्तांना पाठवलेल्या पत्राचे वाचन करून विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्यावर आरोप केले. हर्षकुमारच्या आई-वडिलांना गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहेत.
या प्रश्नांची उत्तरे हवीत...- बनावट मेल आयडी कुठल्या डिव्हाइसवर तयार केला? - उपसंचालकांचे मूळ पत्र कुठून मिळवले, मजकूर कोणी लिहिला? - समितीचे बँक आयडी, पासवर्ड कोणी दिले? बँक स्टेटमेंट बदलून रिपोर्ट द्यायला कोणी सांगितले?