अहमदाबाद - गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हार्दिक हे त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी 27 जानेवारीला विवाह करणार आहेत. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावी अत्यंत साधेपणाने हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
26 आणि 27 जानेवारी असे दोन दिवस हा विवाहसोहळा रंगणार आहे. या लग्नासाठी दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी अशा 100 जणांना निमंत्रण असणार आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील विरामगाम तालुक्यातील चंदननगरी परिसरात हार्दिक आणि किंजल हे अनेक वर्षे राहायचे. किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून पुढचे शिक्षण घेत आहे.
सुरेंद्र नगर जिल्ह्यातील दिगसर गावातील हार्दिक पटेल यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. हार्दिकचे वडील भरत पटेल यांनी 'हार्दिकने लवकरात लवकर विवाहबद्ध व्हावं अशी सर्वांचीच इच्छा होती. त्यासाठी ही योग्य वेळ आहे आम्ही 27 जानेवारी ही तारीख ठरवली आहे. किंजलचे आडनाव पारीख असले तरी हा आंतरजातीय विवाह नाही. किंजल ही पारीख-पटेल असून पाटीदार समाजाचीच आहे' असे सांगितले आहे.