हनुमानाचे आधार कार्ड; घेणारा कुणीही नाही
By Admin | Updated: September 11, 2014 23:18 IST2014-09-11T23:18:58+5:302014-09-11T23:18:58+5:30
राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या दांतारामगड टपाल विभागामध्ये पवनपुत्र आणि श्रीराम भक्त हनुमान यांच्या नावे आधार कार्ड बनून आले आहे़

हनुमानाचे आधार कार्ड; घेणारा कुणीही नाही
जयपूर : राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या दांतारामगड टपाल विभागामध्ये पवनपुत्र आणि श्रीराम भक्त हनुमान यांच्या नावे आधार कार्ड बनून आले आहे़ मात्र अद्याप हे आधार कार्ड स्वीकारणारा कुणीही समोर आलेला नाही़
हनुमानजी, पवन पुत्र, वॉर्ड क्रमांक ६, पंचायत समितीजवळ दांतारामगड, जिल्हा सिकर, राजस्थान, असा पत्ता या आधार कार्डवर नमूद आहे़ बंगळुरूवरून ते तयार होऊन आले आहे़ पोस्टमन गेल्या चार पाच दिवसांपासून या पत्त्याचा शोध घेत फिरत आहे़ मात्र अद्यापही त्याला हनुमानजी सापडलेले नाहीत़
बंगळुरूवरून १४ आॅगस्ट २०१४ रोजी हे आधार कार्ड पोस्ट करण्यात आले होते़ दांतारामगड टपाल विभागाला ते ६ सप्टेंबरला पोहोचले़ पोस्टमनने सलग तीन चार दिवस शोध घेतल्यावरही पत्ता न मिळाल्याने अखेर हे पाकिट उघडण्याचा निर्णय घेतला गेला आणि आतील भगवान हनुमानाच्या नावे असलेले हे आधार कार्ड पाहून सर्वच अवाक झाले.
आधार कार्डावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो कायम स्वीच आॅफ दाखवत आहे़ आता हनुमानजींचे हे आधारकार्ड पुन्हा बंगळुरूच्या पत्त्यावर परत पाठवले जाणार आहे़ (वृत्तसंस्था)