हनुमानाला 'सांताक्लॉज'च्या पेहरावानं वाद! पुजारी म्हणे, अमेरिकेच्या भक्ताने पाठवले कपडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 22:04 IST2018-12-31T21:56:36+5:302018-12-31T22:04:27+5:30
गुजरातमध्ये एका पुजाऱ्यानं हनुमानाला सांताक्लॉजसारखे कपडे घातल्यानं मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे.

हनुमानाला 'सांताक्लॉज'च्या पेहरावानं वाद! पुजारी म्हणे, अमेरिकेच्या भक्ताने पाठवले कपडे
बोटाद- भगवान हनुमान हे दलित, मुस्लिम आणि आदिवासी असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत होती. भगवान हनुमानाच्या जातीचा वाद क्षमत नाही, तोच गुजरातमध्ये एका पुजाऱ्यानं हनुमानाला सांताक्लॉजसारखे कपडे घातल्यानं मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. बोटादमधल्या सारंगपूर मंदिरात विराजमान असलेल्या भगवान हनुमानाच्या मूर्तीला सांताक्लॉजसारखे कपडे घालण्यात आले आहेत. भगवान हनुमानाला दिवसातून दोनदा स्नान घातल्यानंतर कपडे परिधान करण्यात येतात, या विधींतर्गत हे कपडे भगवान हनुमानाला घालण्यात आले आहेत.
मंदिराचे प्रमुख विवेक सागर म्हणाले की, अमेरिकेच्या एका भक्तानं हे सांताक्लॉजचे कपडे पाठवले आहेत. रविवारी हनुमानाला स्नान घातल्यानंतर थंडीपासून संरक्षण व्हावं, यासाठी हे कपडे घातल्याचे पुजाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. परंतु हे कपडे सांताक्लॉजच्या पोशाखासारखे दिसत आहेत. त्यामुळेच या कपड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान हनुमानाच्या जातीवरून वाद सुरू झाला होता.
27 नोव्हेंबरला राजस्थान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथांनी हनुमान दलित असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पुढच्या दिवशी केंद्रीय मंत्री सत्यपाल चौधरी यांनी भगवान हनुमान हा आर्य समाजाचे असल्याचं सांगितलं होतं. हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते, असंही अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय म्हणाले होते. त्यामुळेच वाद निर्माण झाला होता.