गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या बंडानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रयाला यावं लागलं होतं. तेव्हापासून शेख हसीना यांचं आपल्याकडे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी बांगलादेशमधील अंतरिम सरकारकडून केली जात आहे. दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला धमकी देणारं विधान केलं आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारमध्ये कायदेमंत्री असलेले आसिफ नजरूल यांनी सांगितले की, जर भारताने शेख हसीना यांना माघारी पाठवलं नाही तर ही बाब भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण कराराचं सरळ सरळ उल्लंघन असेल.
ढाका येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान, कायदेमंत्री आसिफ नजरूल यांनी सांगितले की, बांगलादेश सरकारने या संबंधांमध्ये भारत सरकारला एक पत्रही लिहिलं आहे. त्यात केलेल्या उल्लेखानुसार भारताला कोणत्याही परिस्थितीत शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करावं लागेल, जर असं झालं नाही तर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हा विषय आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित केला जाईल, असा इशाराही बांगलादेशकडून देण्यात आला आहे.