Hamida Bano News : मागील 22 वर्षांपासून पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय हमीदा बानो(वय 70) सोमवारी(दि.16) लाहोरमधील वाघा बॉर्डरमार्गे मायदेशात परतल्या. एका ट्रॅव्हल एजंटने 2002 साली दुबईला नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली होती. दुबईऐवजी तिला पाकिस्तानात नेले होते. कमी शिकलेल्या हमीदा त्याचा कट समजू शकल्या नाही अन् पाकिस्तानात अडकून पडल्या. आता अखेर त्यामायदेशात परतल्या आहेत.
हमीदाने सांगितली संपूर्ण कहाणी..मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईतील हमीदा बानो 90 च्या दशकापासून कामाच्या शोधात परदेशात जात होत्या. त्यांनी दुबई आणि अबुधाबीमध्ये सुमारे 9 वर्षे काम केले. काम संपल्यावर काही काळासाठी त्या भारतात परतायच्या. पण, 2002 साली विक्रोळी येथील एका एजंटने त्यांना दुबईत चांगली नोकरी आणि भरघोस पगार देण्याचे आश्वासन देऊन पाकिस्तानात नेले.
मुंबईहून थेट पाकिस्तानात पोहचल्याहमीदा सांगता की, विमानातून उतरल्यावर मला पाकिस्तानात आल्याचे समजले. इथे का आणले विचारले, तर मला धमकावण्यात आले. त्यांनी काही दिवस पाकिस्तानातील हैदराबाद येथे एका ठिकाणी ठेवले. तिथे आणखी चार-पाच मुलींना अशाच प्रकारे आणण्यात आले होते. आज ना उद्या नोकरी मिळेल, असे रोज सांगितले जायचे, पण तिला नोकरी कधीच मिळाली नाही. एके दिवशी हमीदा यांनी आरोपीचा नजर चुकून तेथून पळ काढला.
पाकिस्तानातून परत भारतात येण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. अखेर हमीदा यांनी कराचीतील एका पुरुषाशी लग्न केले. तिचे पहिले पती मोहम्मद हनीफ यांचे मुंबईतील 2000 साली निधन झाले, तर पाकिस्तानी पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला. दुसऱ्या पतीला पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांनीच हमीदा यांचा सांभाळ केला. इकडे हमीदा यांची सख्खी मुले मुंबईतील मोठी झाली. 22 वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर हमीदा यांना मुंबईत परतण्याची इच्छा होती. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आता अखेर 72 वर्षीय हमीदा भारतात परतल्या.
पाकिस्तानच्या 'बजरंगी भाईजान'ने केली मदतपाकिस्तानातील वलीउल्लाह मारूफ या सामाजिक कार्यकर्त्यामुळे हमीदाची कहाणी जगासमोर आली. मारूफ हा मशिदीचा इमाम असून, 2018 पासून त्याने पाकिस्तानात तस्करी केलेल्या लोकांना त्यांच्या देशात परत जाण्यास मदत करणे हे आपले ध्येय बनवले आहे. मारूफने हमीदाची मुलाखत घेतली आणि 2022 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट केली. एका भारतीय यूट्यूबर खल्फानने हे शेअर केले, त्यानंतर हा व्हिडीओ कुर्ला येथे राहणाऱ्या हमीदाच्या कुटुंबापर्यंत पोहोचला. अखेर हमीदा यांच्या मुलांनी त्याचा नंबर काढला आणि व्हिडिओ कॉलद्वारे 22 वर्षांनंतर पहिल्यांदा आईशी बोलले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि अखेर हमीदा भारतात परतल्या आहेत.