हॉटेलमध्ये आता फुल प्लेटऐवजी मिळणार हाफ प्लेट ?
By Admin | Updated: April 12, 2017 08:42 IST2017-04-12T08:35:28+5:302017-04-12T08:42:45+5:30
अन्नाची होणारी ही नासाडी टाळण्यासाठी आता केंद्र सरकार हॉटेलमध्ये फुल प्लेटच्या ऐवजी कोणतीही डिश हाफ प्लेटमध्ये देता येईल का, यावर विचार करत आहे.

हॉटेलमध्ये आता फुल प्लेटऐवजी मिळणार हाफ प्लेट ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - ब-याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणतीही डिश फुल प्लेट घ्यावी लागते. एका व्यक्तीला ही फुल प्लेट डिश संपवणं जिवावर येतं. त्यामुळे उरलेलं अन्न टाकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही. मात्र अन्नाची होणारी ही नासाडी टाळण्यासाठी आता केंद्र सरकार हॉटेलमध्ये फुल प्लेटच्या ऐवजी कोणतीही डिश हाफ प्लेटमध्ये देता येईल का, यावर विचार करत आहे. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना ग्राहकांना एका प्लेटमध्ये किती प्रमाणात अन्न मिळणार आहे, हेही आता हॉटेलमालकांना स्पष्ट करावं लागण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना यासंबंधी एक ताकीदच दिली आहे. हॉटेल मालक फुल प्लेटच्या डिशसोबतच हाफ प्लेट डिश देण्याची व्यवस्था करणार नसल्यास आम्ही यासाठी कायदेशीर तरतूर करण्याच्या तयारीत असल्याचं राम विलास पासवान म्हणाले आहेत. वैयक्तिक अनुभवांतून ही कल्पना आली आहे. जेव्हा आपण बाहेर खायला जातो, तेव्हा अन्नाची प्रचंड नासाडी होताना पाहतो. दुसरीकडे देशात असेही काही नागरिक आहेत, ज्यांना खायला अन्न मिळत नाही, असं पासवान यांनी सांगितलं आहे.
देशात प्रमाणाच्या बाहेर अन्नाची नासाडी होत असते, गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून अन्नाच्या होणा-या नासाडीवर चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी ताटात गरजेपुरतं अन्न घ्या आणि घेतलेल्या अन्नाची नासाडी करू नका, असा सल्ला दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर राम विलास पासवान यांनी हे मत व्यक्त केल्याचं बोललं जातंय. हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सनी किती अन्न सर्व्ह करावं, याबाबत सरकार कोणतीही नियमावली करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र तुम्ही एका प्लेटमध्ये किती चपात्या, किंवा इडल्या किंवा चिकनचे पिस देणार, याचा उल्लेख करा, अशी अपेक्षा हॉटेल्सकडून पासवान यांनी व्यक्त केली आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आता फुल प्लेट भाजी घेणं बंधनकारक नसल्याचे सूतोवाच पासवान यांनी केले होते. हाफ किंवा पाव प्लेट भाजी देण्याबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयानं एक मसुदा तयार केला असून, त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. सध्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी हाफ प्लेट भाजी देत नसल्यानं नाइलाजास्तव फुल प्लेट भाजी घ्यावी लागते. एका व्यक्तीला एवढी भाजी संपवणं अवघड जातं. तसेच तुम्हाला फुल प्लेटचे पैसेही मोजावे लागतात, याच पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयानं हे पाऊल उचलणार असल्याचं बोललं जात आहे.