हादियाचे वडील म्हणतात, ती पुन्हा शिक्षण घेणार याचा मला आनंदच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 20:44 IST2017-11-28T20:44:18+5:302017-11-28T20:44:39+5:30
केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून....

हादियाचे वडील म्हणतात, ती पुन्हा शिक्षण घेणार याचा मला आनंदच
नवी दिल्ली : केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. सेलमच्या कॉलेजने हादियाला प्रवेश देऊन तिची तेथे होस्टेलवर राहण्याची व्यवस्था करावी आणि केरळ सरकारने तिला तेथे सुरक्षितपणे नेऊन पोहोचवावे, असा आदेश सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. शिकत असताना हादियाच्या पालकत्वाची जबाबदारी कॉलेजच्या अधिष्ठात्यांवर सोपविली आहे. हिंदू अखिलाने शफीन जहाँ या मुस्लीम तरुणाशी धर्मांतर करून प्रेमविवाह केला. मात्र तिला फितवून मुसलमान केले गेले व तिच्याशी विवाह केला गेला, अशी तक्रार करत तिच्या वडिलांनी याचिका केल्यावर केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रद्दबातल केला होता. त्याविरुद्ध तिच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
काय आहे प्रकरण?
केरळमध्ये राहणाऱ्या शफीन जहानने डिसेंबर महिन्यात एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. हादिया असे त्या महिलेचे नाव असून धर्मांतर केल्यानंतर तिने शफीनशी विवाह केला होता. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. तर एनआयएनेही या प्रकरणात अहवाल दिला होता. केरळमध्ये एक यंत्रणा सुनियोजित पद्धतीने काम करत आहे, ती समाजाचे मतांतर करुन त्यांना कट्टर बनवण्याचे काम करत असून अशा प्रकारची ८९ प्रकरणे उघडकीस आल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले होते. केरळ हायकोर्टाने हा विवाह रद्द ठरवला होता.