दिवाळीची सुट्टी घेऊन घरी आलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र सिस्टिमवरील इंजिनियर आकाशदीप यांचा राहत्या घरीच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय आकाशदीप हे दिल्लीतील डीआरडीओमध्ये कार्यरत होते. घटना घडली तेव्हा आकाशदीप हे पत्नसोबत लखनौमधील आलमबाग येथील घरी होते. आकाशदीप गेल्या ७ वर्षांपासून ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या मोहिमेवर काम करत होते. अतिसंवेदनशील मोहिमेवर काम करत असताना मृत्यू झाल्याने त्यांच्या मृत्यूबाबत सवाल उपस्थित होत आहेत. तसेच त्यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
मृत आकाशदीप यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या मंगळवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर आकाशदीप त्यांच्या पत्नीसह खोलीत गेले. तिथून ते बाथरूममध्ये गेले. तिथून अचानक कुणीतरी पडल्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून कुटुंबीयांनी बाथरूमकडे धाव घेतली. तिथे आकाशदीप हे जमिनीवर पडलेले होते. त्यानंतर त्यांना घाईगडबडीत रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता आकाशदीप यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आकाशदीप यांच्या मृत्यूचं खरं कारण कळेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
आकाशदीप यांची पत्नी भारती ही दिल्लीतील कॅनरा बँकेमध्ये कामाला आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त हे पती-पत्नी लखनौमधील घरी आले होते. याच वर्षी एप्रिल महिन्यात या दोघांचा विवाह झाला होता. आकाशदीप यांचे वडील कुलदीप गुप्ता हे दोन महिन्यांपूर्वीच होमगार्ड विभागातून निवृत्त झाले होते. दरम्यान बाथरूममध्ये कोसळल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने लोकबंधू रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. शवविच्छेजन अहवालामधूनही मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. त्यामुळे त्यांचा व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तसेच या मृत्यूमागचं गुढ अधिकच वाढलं आहे.