ग्वाल्हेरच्या सिंधिया शाळेतील एका विद्यार्थ्याने कमाल केली आहे. मेहनतीच्या जोरावर अनोखा ड्रोन बनवण्यात तो यशस्वी झाला. फोर्ट येथील सिंधिया शाळेतील या हुशार विद्यार्थ्याचं नाव मेधांश त्रिवेदी असं आहे. मेधांशने ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे. या विद्यार्थ्याला तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर यश मिळालं. ड्रोन तयार करण्यासाठी तब्बल साडेतीन लाख रुपये खर्च आला.
मेधांशने या अद्वितीय ड्रोनला MLDT 1 असं नाव दिलं आहे. या होतकरू विद्यार्थ्याने सांगितलं की, चीनचे ड्रोन पाहिल्यानंतर त्याच्या मनात काहीतरी वेगळं करण्याचा विचार आला. शिक्षक मनोज मिश्रा यांनी विद्यार्थ्याच्या कल्पनेला आकार देण्यासाठी प्रोत्साहित केलं. शिक्षकाने तांत्रिकदृष्ट्याही मदत केल्याचं मेदांश सांगतो. विद्यार्थ्याचं आता एअर टॅक्सी कंपनी सुरू करण्याचं स्वप्न आहे. लोकांना स्वस्तात हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे. ड्रोन बनवताना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर शिक्षक आणि कुटुंबीयांच्या मदतीने विद्यार्थ्याने आपलं स्वप्न साकार करण्यात यश मिळवले.
MLDT 1 हा सामान्य ड्रोनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. सिंधिया शाळेच्या स्थापना दिनाच्या समारंभात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मेधांशचं कौतुक केलं होतं. मेधांशने सांगितलं की, ड्रोन व्यक्तीशिवाय चार किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकतो. मात्र, सुरक्षिततेमुळे तो केवळ १० मीटरपर्यंतच उड्डाण करत आहेत. निधीची व्यवस्था झाल्यानंतर हायब्रीड मोडवर ड्रोन लाँच करण्याचं काम केलं जाईल.
मेधांश हा सध्या सिंधिया स्कूलचा विद्यार्थी आहे. येत्या काळात सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारा ड्रोनही तयार करण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. ड्रोनचा वापर इतर ठिकाणी आणि शेतीमध्ये माल नेण्यासाठी केला जाऊ शकतो. शिक्षक मनोज मिश्रा यांनी मेधांशचे कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, मेधांश इयत्ता सातवीपासून नवनवीन शोधांची माहिती घेत असे.
काहीतरी वेगळं करायचं हे त्याचं उद्दिष्ट होतं. त्याने सांगितलं की, तो स्वतः मॉडल्स देखील तयार करतो. मॉडल आणि चीनचे मानवयुक्त ड्रोन पाहिल्यानंतर मेदांशला ड्रोन बनवण्याची प्रेरणा मिळाली. मेधांशची प्रतिभा पाहून शाळेचा स्टाफही मदतीसाठी पुढे आला आहे. सध्या या ड्रोनची जोरदार चर्चा रंगली आहे. मेधांशचं सर्वच जण भरभरून कौतुक करत आहेत.