"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:55 IST2025-10-01T17:51:11+5:302025-10-01T17:55:16+5:30
PM Modi On Rss 100 years: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंतच्या वाटचालीबद्दलच्या आठवणी सांगितल्या.

"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
RSS 100 Years PM Modi Speech: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली. शताब्दी वर्षपूर्तीबद्दल दिल्लीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव गोळवलकर यांच्याबद्दलची आठवण सांगत काही मुद्द्यांवर भाष्य केले.
दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधीही विरोधाभास निर्माण झाला नाही. कारण प्रत्येक घटकातील विचार आणि राष्ट्र प्रथम हा एकच उद्देश. स्थापनेपासूनच संघ मोठे उद्दिष्ट घेऊन चालत आहे, हा उद्देश राष्ट्र निर्माणाचा आहे."
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे असंख्य प्रयत्न झाले. गुरुजींना खोट्या प्रकरणात अडकवलं गेलं. त्यांना तुरुंगात पाठवलं गेलं. पण, जेव्हा गुरूजी बाहेर आले. ते सहज म्हणाले की, 'कधी कधी जीभ दातांमध्ये येते. कधी कधी चावली जाते. पण, आपण दात पाडत नाही. कारण दातही आपलेच आहेत आणि जीभही', अशा शब्दात मोदींनी आठवणींना उजाळा दिला."
"स्वातंत्र्यानंतर हैदराबाद संस्थानात निजामाच्या अत्याचाराविरोधातील आंदोलनापासून ते गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनापर्यंत देश प्रथम भावनेने अनेकांनी बलिदान दिले. या 100 वर्षांच्या काळात संघाने एक मोठे काम केले आहे, ते म्हणजे आरएसएसने अशा घटकांपर्यंत पोहचून काम केले आहे की, ज्यांच्यापर्यंत पोहचणं अवघड आहे. आपल्या देशात १० कोटी आदिवासी भाई बहिणी आहेत. संघाने त्यांची संस्कृती, उत्सव आणि त्यांच्या भाषेला प्राधान्य दिलं", असे मोदी म्हणाले.
"स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिरडून टाकण्याचेच प्रयत्न झाले. संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखणारी षडयंत्र केली गेली. तु्म्ही कल्पना करू शकता की, गुरूजींना इतक्या वेदना तुरुंगात दिल्या गेल्या. पण, तरीही त्यांच्या मनात कोणतीही द्वेषाची, तिरस्काराची भावना निर्माण झाली नाही", अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.