गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 07:56 IST2025-10-18T07:55:38+5:302025-10-18T07:56:16+5:30
क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात ८ मंत्री पटेल समाजाचे आहेत.

गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
गांधीनगर : गुजरातमध्ये राज्य मंत्रिमंडळ फेरबदलात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी १९ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले असून, मागील कार्यकाळातील ६ मंत्र्यांना कायम ठेवले आहे. यामध्ये हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात ८ मंत्री पटेल समाजाचे आहेत.
या फेरबदलानंतर मंत्रिमंडळाचा एकूण आकार १७ वरून वाढून २६ सदस्यांचा झाला आहे. गुजरात विधानसभेतील १८२ सदस्यांच्या संख्येनुसार, जास्तीत जास्त २७ मंत्र्यांची नियुक्ती करता येते (१५%). ही पुनर्रचना २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या दोन वर्षे आधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काही महिने आधी करण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नव्या मंत्र्यांना आणि पदोन्नती झालेल्या मंत्र्यांना शपथ दिली.
हर्ष संघवी उपमुख्यमंत्रिपदी
सुरतच्या माजुरा मतदारसंघाचे आमदार हर्ष संघवी हे यापूर्वी गृह राज्यमंत्री होते. आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांना बढती देण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच राज्यात उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. याआधी नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री होते. मात्र २०२१ मध्ये हे पद रद्द करण्यात आले.
असे आहे नवे मंत्रिमंडळ
९ कॅबिनेट मंत्री
१३ राज्यमंत्री
३ स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री
सहा मंत्री कायम, दहा जणांना डच्चू : गुरुवारी १६ मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यापैकी ६ जण नव्या मंत्रिमंडळात कायम आहेत. कनुभाई पटेल, ऋषिकेश पटेल, कुंवरजी बवालिया, हर्ष संघवी, प्रफुल्ल पंशेरिया, पुरुषोत्तम सोलंकी यांचा यात समावेश आहे. संघवी आणि पंशेरिया यांनी नव्याने शपथ घेतली.