Gujarat Crime :गुजरातच्या गांधीनगरमधील एका माणसासाठी वैवाहिक आनंद जीवघेणा ठरला. गांधीनगरमध्ये एका महिलेने लग्नाच्या चार दिवसांनीच पतीची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचे तिच्या चुलत भावावर प्रेम होते. परंतु तिचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते आणि त्यांनी मुलीचे दुसरीकडे लग्न लावून दिलं. मात्र यानंतर लग्नाच्या चौथ्याच दिवशी महिलेने प्रियकरासह पतीची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.
अहमदाबादमधील रहिवासी असलेल्या भाविकचे गांधीनगरमधील पायलशी लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या चार दिवसांनी तिघांनी त्याचे अपहरण करून हत्या केली. प्राथमिक तपासादरम्यान, पायलनेच तिचा चुलत भाऊ कल्पेश याच्यासोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता, असे समोर आले आहे. कल्पेशवर पायल लग्नाआधीपासून प्रेम करत होती. याच कारणामुळे तिने भावेशला संपवलं.
भाविकचे लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनी अपहरण करण्यात आले. भाविक हा पत्नीला घेण्यासाठी सासऱ्यांकडे जात होता. मात्र तो पत्नीच्या घरी पोहोचला नाही. त्यानंतर सासरच्यांनी भाविकच्या वडिलांना फोन करून भाविक आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर भाविकच्या सासरचे आणि त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. सासरच्या लोकांनी भाविकचा शोध घेतला असता त्याची ॲक्टिव्हा दिसली. जवळच चौकशी केली असता, इनोव्हा कारमधून आलेल्या तिघांनी भाविकला उचलून नेल्याचे समजले. ही माहिती भाविकच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर भाविकच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात या सगळ्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल केला. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच पतीचे अपहरण झाल्यामुळे पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता या प्रकरणात पायलचा सहभाग असल्याचे समोर आलं. पोलिसांनी भाविकच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून भाविकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या पत्नीची चौकशी केली असता पोलिसांचा संशय बळावला आणि तिने सगळंच सांगितले. तिचे चुलत भावावर प्रेम होते, पण घरच्यांनी भाविकशी तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर पायल आणि कल्पेश यांनी भाविकला त्यांच्या मार्गावरून दूर करण्याचा प्लॅन केला, असं पायलने सांगितले.
लग्नाच्या चौथ्या दिवशी भाविक सासरच्या घरी जात असताना पायलने तो कुठे आहे असे विचारून त्याची माहिती कल्पेशला दिली. त्यानंतर कल्पेश त्याच्या कुटुंबीयांसह इनोव्हामध्ये आला आणि भाविकच्या ॲक्टिव्हाला धडक दिली. त्यामुळे भाविक खाली पडला आणि त्यानंतर त्यांनी त्याचे अपहरण केले. भावेशला गाडीत बसवल्यानंतर त्याची लगेच गळा आवळून हत्या करण्यात आली आणि नंतर तो सापडू नये म्हणून त्याचा मृतदेह नर्मदा कालव्यात फेकून दिला, अशी माहिती कल्पेशने दिली.
भाविकचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी कल्पेश आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून पायललाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. चुलत भावाच्या प्रेमात आंधळी झालेल्या पायलने लग्नाच्या चौथ्याच दिवशी पतीची हत्या केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता तिला उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागणार आहे.