गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. निवडणूक झालेल्या राज्यामधील ६८ पालिकांपैकी ६० पालिकांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेसला केवळ एका नगरपालिकेमध्ये विजय मिळवता आला आहे. आम आदमी पक्षाला एकाही पालिकेत विजय मिळालेला नाही. तर समाजवादी पार्टीने दोन पालिकांमध्ये विजय मिळवला आहे. तीन पालिकांमध्ये टाय झाली आहे. तर एका पालिकेत अपक्षांनी वर्चस्व राखलं आहे. तर एका पालिकेमध्ये कुणालाही बहुमत मिळालेलं नाही.
मागच्या वेळी गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ५१ पालिकांमध्ये विजय मिळवला होता. या वेळी हा आकडा ६० पर्यंत पोहोचला आहे. एकूणच स्थानिक पालिकांमध्ये भाजपाने एकूण १४०३ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने २६०, समाजवादी पार्टीने ३४, आपने २८ आणि बसपाने १९ जागांवर विजय मिळवला आहे. तर १५१ जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत.
भाजपाने जुनागड नगरपालिकेमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. येथील ६० पैकी ४८ जागांवर भाजपाने बाजी मारली आहे. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये निरंतरपणे विकास सुरू आहे. तसेच जनतेने पुन्हा एकदा आम्हाला पाठिंबा दिला आहे.