गुजरात : हार्ट अटॅकमुळे ६ महिन्यात १०५२ जण दगावले; मृतांमध्ये ११-२५ वयोगटातील तरूण सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:13 IST2023-12-04T16:13:25+5:302023-12-04T16:13:39+5:30
गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मागील सहा महिन्यांत तब्बल १०५२ लोकांचा मृत्यू झाला.

गुजरात : हार्ट अटॅकमुळे ६ महिन्यात १०५२ जण दगावले; मृतांमध्ये ११-२५ वयोगटातील तरूण सर्वाधिक
Heart Attack in Gujarat : गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मागील सहा महिन्यांत तब्बल १०५२ लोकांचा मृत्यू झाला. शिक्षणमंत्री कुबेर डिंडोर यांनी याला दुजारा देताना, मृतांमध्ये सर्वाधिक तरूणांचा समावेश असल्याचे सांगितले. ११ ते २५ वयोगटातील विद्यार्थी आणि तरूण हे हृदयविकाराने ग्रस्त आहेत. मृतांमध्ये जवळपास ८० टक्के तरूणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
हृदयविकाराचा वाढता धोका पाहता राज्य सरकारने उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. लोकांना आरोग्याची काळजी घेण्याचे धडे देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमावलेल्यांची आकडेवारी माझ्याकडे नाही. पण, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ICMR द्वारे अभ्यास केला जात आहे. राज्य सरकार अशा बाबतीत जनजागृती करत आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूला कोरोनाची लस जबाबदार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सहा महिन्यांत १०५२ दगावले
हृदयविकाराच्या वाढत्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गुजरात सरकार प्रयत्नशील आहे. शिक्षण मंत्री डिंडोर यांनी गांधीनगर येथे सांगितले की, गुजरातमध्ये मागील सहा महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने १०५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थी ११ ते २५ वयोगटातील होते. मात्र, या विद्यार्थी आणि तरुणांमध्ये लठ्ठपणाची कोणतीही तक्रार नव्हती. १०८ रुग्णवाहिका सेवेला हृदयविकाराशी संबंधित दररोज सरासरी १७३ फोन येतात. यासाठी राज्य सरकारकडून जनजागृती केली जात आहे.
तसेच राज्याच्या शिक्षण विभागाच्या नवीन उपक्रमांतर्गत सुमारे दोन लाख शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षकांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्यासाठी १७ डिसेंबरपर्यंत ३७ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे अडीच हजार वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर उपस्थित राहणार असून सहभागींना प्रमाणपत्रही देण्यात येईल, असेही दिंडोर यांनी सांगितले.