गुजरातमध्ये दलित युवकाने प्रसिद्धीसाठी रचला हल्ल्याचा बनाव, पोलिस तपासातून झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:14 IST2017-10-06T18:08:01+5:302017-10-06T18:14:25+5:30
शाळेची परिक्षा देऊन घरी परतत असताना मंगळवारी संध्याकाळी 5.30च्या सुमारास हल्ला झाला असे या युवकाने सांगितले होते.

गुजरातमध्ये दलित युवकाने प्रसिद्धीसाठी रचला हल्ल्याचा बनाव, पोलिस तपासातून झाले उघड
अहमदाबाद - गुजरातच्या गांधीनगरमधील लिमबोदारा गावात राहणा-या 17 वर्षीय दलित युवकावर कोणताही हल्ला झालेला नसून, त्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा सर्व बनाव रचल्याचे गुजरात पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. स्टायलिश मिशी ठेवल्याच्या रागातून आपल्यावर ब्लेडने हल्ला करण्यात आला अशी तक्रार या युवकाने केली होती.
शाळेची परिक्षा देऊन घरी परतत असताना मंगळवारी संध्याकाळी 5.30च्या सुमारास हल्ला झाला असे या युवकाने सांगितले होते. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी कोणतेही ब्लेड सापडले नाही तसेच मारेकरी किंवा गाडी सापडली नाही असे गांधीनगर पोलिसांनी सांगितले. स्थानिक पान विक्रेत्यानेही पोलिसांना दिलेल्या जबानीत असा कोणताही हल्ला पाहिला नसल्याचे सांगितले. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने आपणच ब्लेडने जखम करुन घेतल्याचे या युवकाने कबूल केले.
माझ्यावर कोणीही हल्ला केला नाही. मी माझ्या दोन मित्रांच्या मदतीने स्वत:ला जखम करुन घेतली असे या युवकाने सांगितले. आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे त्याने सांगितले. मागच्याच आठवडयात या गावातील दोन दलितांना स्टायलिश मिशी ठेवली म्हणून मारहाण करण्यात आली होती. दरबार समुदायातील काही जणांवर या मारहाणीचा आरोप आहे.
दलित तरुणांनी स्टायलिश मिशी ठेवणे या समुदायातील काही जणांना पसंत नव्हते. त्यातून ही मारहाण झाली. या मारहाणीच्या निषेधार्थ साणंद आणि आसपासच्या गावातील 300 दलित तरुणांनी व्हॉटस अॅपवर मिशीचा डिपी ठेवला आहे. या डिपीमध्ये स्टायलिश मिशी दाखवण्यात आली आहे. मिशीच्या खाली मुकुट आणि त्याखाली मिस्टर दलित लिहीले आहे.