गुजरातमध्ये काँग्रेसचे पॅक- अप, जुनागढ महापालिकाही गमावली
By Admin | Updated: July 22, 2014 15:28 IST2014-07-22T15:07:13+5:302014-07-22T15:28:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसची वाताहत सुरुच असून मंगळवारी गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या जुनागढ महापालिकेवरही भाजपचा झेंडा फडकला आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसचे पॅक- अप, जुनागढ महापालिकाही गमावली
ऑनलाइन टीम
जुनागढ, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसची वाताहत सुरुच असून मंगळवारी गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या जुनागढ महापालिकेवरही भाजपचा झेंडा फडकला आहे. जुनागढ महापालिकेतील ६० पैकी ४१ जागांवर भाजपने दिमाखदार विजय मिळवत काँग्रेसचे राज्यातून पॅक-अपच केले आहे.
गुजरातमध्ये नऊ महानगरपालिका असून यातील आठ भाजप तर एक काँग्रेसच्या ताब्यात आहे. गुजरातमधील सौराष्ट्र भागात जुनागढ महानगरपालिकेचा समावेश होतो. या भागात काँग्रेसचे वर्चस्व असून जुनागढ महापालिकेवरही गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा दिमाखाने फडकत आहे. काँग्रेसचा गड समजला जाणा-या जुनागढला यंदा भाजपने सुरुंग लावला आहे. जुनागढ महापालिकेच्या ६० पैकी ४१ जागांवर भाजपने विजय मिळवत काँग्रेसला नेस्तनाबूत केले आहे. त्यामुळे आता गुजरातमधील सर्व महानगरपालिकांवर भाजपची सत्ता असून राज्यातील नगरपरिषदांपैकी ७५ टक्के नगरपरिषदांवर भाजपचीच सत्ता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ जागांवर विजय मिळवला होता.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी गेल्यावर त्यांच्या कट्टर समर्थक आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाशिवाय पार पडलेली ही गुजरातमधील पहिलीच निवडणूक होती. यात मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी भाजपला विजय मिळवून देत मोदींची जागा घेण्यास आपण सक्षम आहोत हे सिद्ध केले आहे. येत्या काही महिन्यात गुजरातमधील विधानसभा आणि लोकसभेसाठी पोट निवडणूक होणार आहे. यात मोदींनी सोडचिठ्ठी दिलेल्या मतदार संघांचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत आनंदीबेन पटेल यांचा कस लागेल हे मात्र नक्की.