गुजरात विधानसभा निवडणूक- एका मतदारासाठी गिरच्या जंगलात उभारणार मतदान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 12:11 IST2017-11-27T11:48:16+5:302017-11-27T12:11:08+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक- एका मतदारासाठी गिरच्या जंगलात उभारणार मतदान केंद्र
अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मतदारांना कुठल्याही प्रकारे त्रास व्हायला नको म्हणून निवडणूक आयोग महिला आणि दिव्यांगासाठी विशेष सोयीसुविधा करत आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोग सोमनाथ जिल्ह्यातील बानेज गावात एका मतदारासाठी मतदान केंद्र तयार करणार आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे.
बानेज गावाच्या गिरमधील जंगलामध्ये एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. प्रसिद्ध गिर सेंच्युरीच्या आता हे तीर्थक्षेत्र आहे. या गावात बनेश्वर महादेव मंदिराचे एक पुजारी महंत भारतदास गुरू दर्शना राहतात. बानेज गावाचे ते एकमेव मतदार आहेत. या एका मतदारासाठी निवडणूक आयोग त्या गावात मतदान केंद्र तयार करणार आहे.
या मतदारासाठी निवडणूक आयोग 2002पासून तेथे मतदान केंद्र स्थापन करते. यावेळीही मतदानासाठी 5 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुर्ण दिवस तेथे तैनात असतील. महंत भारतदास यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोग केंद्र स्थापन करत आहे.
9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.मागच्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाने गुजरातची लढाई प्रतिष्ठेची केली आहे.