Gujarat Crime:गुजरातच्या साबरकांठा येथून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. गुजरातमधील साबरकांठा येथे एका विद्यार्थिनीवर तिच्या शाळेतील शिक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नराधम शिक्षकाने दहावीच्या होतकरू विद्यार्थिनीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. अत्याचार झालेल्या या विद्यार्थिनीचे काही दिवसांपूर्वीच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर झालेल्या भाषण स्पर्धेत कौतुक करण्यात आलं होतं. तिने भाषणासाठी प्रचंड टाळ्या मिळवल्या होत्या. मात्र आता हीच विद्यार्थिनी अत्याचाराला बळी पडली.
साबरकांठा येथील शाळेत २६ जानेवारीला पीडित विद्यार्थिनीने बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर भाषण देऊन सर्वांची मने जिंकली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी तिच्या शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतरही विद्यार्थिनीचे मनोधैर्य खचलेलं नाही. १५ वर्षांची ही मुलगी कमालीचे धाडस दाखवून २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहे. तिचे स्वप्न पोलीस अधिकारी होण्याचे आहे.
७ फेब्रुवारी रोजी ३३ वर्षीय शिक्षकाने विद्यार्थिनीला वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. तिला बोर्डाच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी देत आरोपी शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला. या सगळ्या प्रकारानंतर याबाबत कोणालाही सांगू नको असंही शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकावलं होतं.
दरम्यान, या घटनेनंतर मुलगी तिच्या काकाच्या घरी राहत आहे. तिच्या नात्यातील दोन मुलीही बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. लोकांनी आणि नातेवाईकांनी रोज येऊन तिच्या अभ्यासात व्यत्यय आणू नये, असे तिच्या काकांना वाटते. तिला तिच्या दोन बहिणींकडून खूप भावनिक आधार मिळत आहे, ज्या कठीण काळात तिला साथ देत आहेत. "मला नेहमीच पोलिस अधिकारी व्हायचे होते. विज्ञान आणि गणित हे माझे आवडते विषय आहेत. मी माझ्या बोर्डाच्या निकालावर आधारित माझा पुढील विषय निवडेन," असं पीडित मुलीने म्हटलं आहे.