आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 05:28 IST2025-09-22T05:28:01+5:302025-09-22T05:28:32+5:30
पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेचा नारा, स्वदेशी वस्तू खरेदीवर भर देण्याचे आवाहन

आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी दरामध्ये केलेल्या सुधारणा लागू होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात स्वदेशीची हाक दिली. नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांमुळे भारताच्या वृद्धीगाथेला गती मिळेल आणि उद्योग - व्यवसायांच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण होऊन आणखी गुंतणूकदार आकर्षित होतील, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणात नमूद केले की, २२ सप्टेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होईल आणि आयकरात मिळणारी सूट पाहता बहुतांश भारतीयांसाठी हा दुहेरी लाभ ठरेल. विकासाच्या या स्पर्धेत देशातील सर्व राज्ये समान वाटेकरी असतील, असे सांगून या राज्यांनी स्वयंपूर्ण भारत आणि स्वदेशी अभियान लक्षात घेऊन उत्पादनाला गती द्यावी, असे आवाहन मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी या सुधारणांचा लाभ सामान्यांना कसा होईल, हे पण स्पष्ट केले. त्यानुसार, लोक आपल्या पसंतीच्या वस्तू सहजपणे खरेदी करू शकतील. यामुळे गरीब, मध्यम वर्ग, नवश्रीमंत, युवक, शेतकरी, महिला, व्यापारी व दुकानदारांना लाभ होईल. या माध्यमातून सणासुदीच्या या काळात आनंदी वातावरण निर्माण होईल, असेही मोदी म्हणाले. कर आणि टोलच्या जाळ्यात अनेक व्यावसायिक व ग्राहकांची कशी अडचण झाली होती, याचा उल्लेखही त्यांनी केला.
आजपासून ३७५ वस्तू स्वस्त
जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर आज सोमवारपासून स्वयंपाकघरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, औषधे, उपकरणांपासून ऑटोमोबाइलपर्यंतच्या क्षेत्रात समाविष्ट ३७५ वस्तूंचे दर कमी होतील. जीएसटी परिषदेने ग्राहकांना ही भेट देताना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून नवे जीएसटी दर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. देशात आता दुकाने मेड इन इंडिया वस्तूंनी सजवा आणि ज्या वस्तू खरेदी कराल, त्याही देशात उत्पादित झालेल्याच असाव्यात, याकडे लक्ष द्या. स्वदेशीचा हा अभिमान प्रत्येकाने बाळगला तर भारत अत्यंत वेगाने विकसित राष्ट्र होईल, असे मोदी म्हणाले.
कोणत्या वस्तू होतील स्वस्त?
दररोजच्या वापरातील पदार्थ : तूप, पनीर, लोणी, नमकीन, सॉस, जॅम, सुकामेवा, कॉफी, आईस्क्रीम.
घरी लागणाऱ्या वस्तू : टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन.
औषधे व वैद्यकीय साहित्य : बहुतांश औषधे, ग्लुकोमीटर, डायग्नॉस्टिक किट्सवर जीएसटी आता फक्त ५%
घरखरेदीदारांना फायदा : सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी
सौंदर्य व आरोग्य सेवा : हेल्थ क्लब, सलून, बार्बर, फिटनेस सेंटर, योगा सेवांवर जीएसटी १८% ऐवजी ५%
इतर दैनंदिन वस्तू : केसांचे तेल, टॉयलेट सोप, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट यांवरील कर १२ किंवा १८% वरून थेट ५%., टाल्कम पावडर, फेस पावडर, शेव्हिंग क्रीम, आफ्टरशेव लोशनवरही कर १८% वरून ५%.
वाहनांमध्ये मोठा दिलासा : लहान कार्सवर जीएसटी १८% आणि मोठ्या कार्सवर २८% लागू होणार आहे. अनेक वाहन कंपन्यांनी किंमत कपात जाहीर केली असून, ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.
स्वदेशीच्या मंत्राने समृद्धी
देशातील लोकांनी स्वदेशी वस्तू - साहित्याची विक्री किंवा खरेदी करताना अभिमान बाळगावा. स्वदेशीच्या या मंत्रानेच भारताची समृद्धी अधिक बळकट होईल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारताने २०१७मध्ये जीएसटी सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकले तेंव्हाच एक नवा इतिहास रचला जाण्याचा प्रारंभ झाला. जीएसटीतील या सुधारणांमुळे ‘एक राष्ट्र-एक कर’ या संकल्पनेचे स्वप्न साकार झाले आहे. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकरात सूट आणि जीएसटी सुधारणा यामुळे बहुतांश लोकांना दुहेरी लाभ होणार आहे. या सुधारणांमुळे लहान आणि मध्यम उद्योगांना मोठा फायदा होणार आहे असं मोदी म्हणाले.