डीजेच्या तालावर नाचत होता नवरदेव; हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, लग्नघरावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:12 IST2022-05-06T16:12:26+5:302022-05-06T16:12:46+5:30
नवरदेवाच्या मृत्यूनं लग्नघरावर कोसळला दु:खाचा डोंगर

डीजेच्या तालावर नाचत होता नवरदेव; हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, लग्नघरावर शोककळा
सूरत: गुजरातच्या सूरतमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वरात निघण्याच्या आधी मित्रांसह डीजेच्या तालावर नाचत असलेल्या नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सूरतमधल्या मांडवीतील अरेठ गावात हृदयद्रावक घटना घडली. ३३ वर्षांच्या मितेश चौधरीची वरात बालोडमधील धामोंदला गावात जाणार होती. वरात निघण्यापूर्वीचे बरेचसे विधी संपन्न झाले होते. थोड्याच वेळात वरात निघणार होती. आनंदाच्या क्षणी कुटुंबीय, मित्रपरिवार डीजेच्या तालावर नाचत होते.
मित्रांना नाचताना पाहून मितेशही त्यांच्यात सहभागी झाला. मित्रांनी मितेशला खांद्यावर उचलून घेतलं. मितेश आनंदानं नाचत होता. तितक्यात त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्या. वेदना वाढल्यानं नातेवाईक मितेशला घेऊन स्थानिक रुग्णालयात घेऊन गेले. तिथल्या डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला.
नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावून मितेशला बारडोलीतील सरकारी रुग्णालयात नेलं. तिथे असलेल्या डॉक्टरांनी मितेशला मृत घोषित केलं. मितेशच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबीयांवर शोककळा पसरली. डीजेचा दणदणाट सुरू असलेल्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला.