अमृतसर : अमृतसरच्या खंडवाला परिसरात शुक्रवारी रात्री १२:३० वाजता ग्रेनेड हल्ला झाला. ठाकुरद्वारा मंदिराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ग्रेनेड हल्ला केला. हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, मंदिराच्या पहिल्या मजल्याची भिंत, दरवाजे आणि काचेचे नुकसान झाले. या प्रकरणी बिहारमधून तिघांना अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवरून ठाकुरद्वारा मंदिराकडे येताना दिसतात. त्यापैकी एकाने मंदिराकडे काही स्फोटक पदार्थ फेकले आणि नंतर ते घटनास्थळावरून पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले.
अमृतसरचे पोलिस आयुक्त म्हणाले की, मंदिराच्या पुजाऱ्याने पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी बिहारच्या मधेपुरा येथून तीन जणांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेले तिघे बब्बर खालसाशी संबंधित आहेत. या घटनेमागे पाकिस्तानचा हात असण्याची शक्यताही पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली.