जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५व्या वाढदिवसानिमित्त देशभरात आरोग्य शिबिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 08:07 IST2025-09-18T08:06:37+5:302025-09-18T08:07:50+5:30

स्वच्छता मोहिमांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन; शाहरूख खान, अमीर खानसह मान्यवरांनीही दिल्या शुभेच्छा

Greetings showered on Modi from all over the world, health camps held across the country on the occasion of Prime Minister Narendra Modi's 75th birthday | जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५व्या वाढदिवसानिमित्त देशभरात आरोग्य शिबिरे

जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५व्या वाढदिवसानिमित्त देशभरात आरोग्य शिबिरे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५वा वाढदिवस बुधवारी (दि. १७) मोठ्या उत्साहात साजरा झाला. डोळ्यांसमोर मोठे ध्येय ठेवण्याची व ते साध्य करण्याची संस्कृती देशात तुमच्यामुळे रुजली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे. तसेच उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते आणि जगभरातील अनेक प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. वाढदिवसानिमित्त भाजपने ‘सेवा पखवाडा’ या १५ दिवसांच्या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात केली. त्यानिमित्त भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारांनी २ ऑक्टोबरपर्यंत देशभर आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, स्वदेशी वस्तूंचे मेळे, वैचारिक सत्रे अशा विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे.

ही नक्की ‘क्रांती’ आहे की, केवळ ‘भ्रांती’?

गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याग व समर्पणाचे प्रतीक आहेत. ते गेली पाच दशकं लोकसेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी शुभेच्छा दिल्या.

अनेक सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

अभिनेते धर्मेंद्र, जितेंद्र, शाहरूख खान आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांचे नेतृत्व, समर्पण आणि देशासाठीच्या योगदानाचेही कौतुक केले.

दूरदर्शनने आशा भोसले, आलिया भट्ट, आमिर खान, अजय देवगण, महेश बाबू आणि एस. एस. राजामौली यांच्या शुभेच्छा संदेशांचे व्हिडीओ शेअर केले. अभिनेते शाहरूख खान यांनी म्हटले आहे की, एका लहान गावातून जागतिक स्तरावर पोहोचण्याचा मोदी यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. आशा भोसले यांनी सांगितले की, मोदी दररोज पहाटे ४:०० वाजता उठतात, मी कधीच त्यांना कोणाविषयी वाईट बोलताना ऐकलं नाही. ते खूप प्रेमळ आहेत.

मिळालेल्या भेटवस्तूंचा वाढदिवसानिमित्त ई-लिलाव

मोदी यांना भेट स्वरूपात मिळालेल्या विविध प्रकारच्या १,३०० वस्तूंच्या ई-लिलावाला बुधवारी सुरुवात झाली. ई-लिलाव २ ऑक्टोंबरपर्यंत चालेल.

या ई-लिलावात देवी भवानी मातेची मूर्ती, अयोध्येतील राम मंदिराचे एक मॉडेल व २०२४ मधील पॅराॅलिम्पिक खेळांमधील क्रीडा स्मृतिचिन्हांचा समावेश आले. या लिलावातून जमा होणाऱ्या निधीचा उपायोग ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी केला जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Greetings showered on Modi from all over the world, health camps held across the country on the occasion of Prime Minister Narendra Modi's 75th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.