राज्यकर्त्यांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:54+5:302015-02-14T23:51:54+5:30
मोरे : महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार

राज्यकर्त्यांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही
म रे : महापालिकेच्या वतीने नागरी सत्कारनाशिक : राजकारण्यांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसते, साहित्य संमेलनात त्यांची हजेरी हा वादाचा मुद्दा नसावा, असे मत घुमान येथे होणार्या ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाशिक महापालिकेच्या वतीने महापौरांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राजकारणी लोकांना साहित्य संमेलनाचे वावडे नसावे. परंतु त्या दोघांनीही औचित्याचा मुद्दा टाळायला हवा. राजकारणी साहित्यिकांना मदत करतात. त्यातून आपण साहित्यिकांवर उपकार करीत आहोत ही भावना नसावी, असेही ते म्हणाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी, असे आपल्यालाही वाटते. परंतु लोकशाहीमुळे निवडणुका ही अपरिहार्य बाब झाली आहे. निवडणूक ही वाईट गोष्ट नाही, मात्र ती कशी लढवली जाते, यावरच सर्व काही अवलंबून आहे. घुमान येथे होणार्या वादावर ते म्हणाले की, मला माझ्या संवादावर विश्वास आहे आणि समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे, सुटे तो वाद संवाद. त्यामुळे या वादाबद्दल चिंता असण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा देणारे हे संमेलन असून, मराठ्यांनी युद्धात अटकेपार झेंडे रोवले त्या पराक्रमाची पुनरावृत्ती घडण्याची ही घटना असल्याचेही ते म्हणाले. कोणत्याही मान्यवर व्यक्तीबद्दल अवमानकारक बोलू नये, अपशब्द वापरू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, अण्णा झेंडे आदि उपस्थित होते.